पिंपरी : शहरात पिंपरी ते दापोडी या मार्गावर मेट्रो धावत असून या मार्गिकेखाली महापालिका सुशोभित खांब आणि खांबांवर एक हजार दिवे लावणार आहे. त्यासाठी सहा कोटींचा खर्च करण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. एकीकडे महापालिकेला विकासकामांसाठी कर्ज काढण्याची वेळ आली असताना सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळण केली जात असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त हाेऊ लागली आहे.
महामेट्रोने चिंचवडचा मदर टेरेसा उड्डाणपूल ते दापोडीच्या हॅरिस पुलापर्यंत मेट्रोची मार्गिका उभारली आहे. या मार्गात ३२२ खांब आहेत. हे काम करताना महामेट्रोने महापालिकेने दुभाजकावर लावलेले दिव्याचे खांब काढून टाकले. आता मार्गिकेखाली महापालिका दिव्यांचे खांब बसवून सुशोभीकरण करणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने सात कोटी ९४ लाख २८ हजार ४६८ खर्चाची निविदा काढली होती. त्यात पाच ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यातील दोन ठेकेदार पात्र ठरले. त्यात लेक्सा लायटिंग टेक्नॉलॉजीची २५.०२ टक्के कमी दराची निविदा पात्र ठरली आहे. त्यांनी सादर केलेला पाच कोटी ९५ लाख ५५ हजारांचा दर योग्य, वाजवी असल्याने निविदा स्वीकारण्यास आणि त्यांच्यासोबत करारनामा करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली.
महापालिकेच्या निधीतून महामेट्रोचे काम
मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करून सुशोभीकरण करण्याचा दावा महामेट्रोने केला होता. दुभाजकात रोपे लावून सुशोभीकरण, सांडपाण्याचा फेरवापर करणार असे अनेक दावे महामेट्रोने केले. मात्र, महामेट्रोच्या कामामुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांची डागडुजी महामेट्रोने केलेली नाही. ‘मर्ज इन’ व ‘मर्ज आउट’साठी तयार केलेला नवा मार्ग पूर्ववत केला नाही. दर्जाहीन काम केल्याने अनेक ठिकाणी दुभाजक तुटून पडले आहेत. मेट्रोचे काम महापालिका निधीतून केले जात आहे.
हेही वाचा : बदलती जीवनशैली, प्रदूषणामुळे श्वसनविकाराचा धोका वाढतोय! आरोग्यतज्ज्ञ म्हणतात, वेळीच लस घ्या…
महापालिकेच्या विद्युत विभागाचे सह शहर अभियंता संजय खाबडे म्हणाले की, मेट्रो मार्गिकेखाली सुशोभित दिवे लावण्यात येणार आहेत. हे दिवे ‘डीएमएस’ प्रकाराचे आहेत. विशिष्ट दिवसानुसार वेगवेगळी प्रकाश व्यवस्था करता येणार आहे. त्यामुळे मार्ग अधिक आकर्षक दिसणार आहे. संबंधित संस्था पाच वर्षे दिव्यांची देखभाल करणार आहे.