पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जास्त बूथ संख्या असलेल्या तीन मतदान केंद्रांची पाहणी केली. मार्चच्या पंधरवड्यात लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने निवडणूक आयोग, पोलीस आणि अन्य सर्व विभागांनी तयारी सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तीन लोकसभा मतदारसंघाचा भाग येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, निगडी, देहूरोड, रावेत, वाकड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचा काही भाग येतो. तर, शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी, एमआयडीसी भोसरी, चिखली, दिघी, आळंदी, चाकण, महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यांचा भाग येतो. तर, हिंजवडी पोलीस ठाण्याचा काही परिसर बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांना निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

हेही वाचा : पिंपरी : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तीन टोळ्यांवर ‘मोक्का’; १७ गुन्हेगार तडीपार

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुरुवारी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक बूथसंख्या असलेल्या मतदान केंद्रांना भेट दिली. महादू सस्ते महापालिका शाळा बोऱ्हाडेवाडी, सावित्रीबाई फुले महापालिका शाळा मोशी गावठाण, नागेश्वर विद्यालय मोशी या मतदान केंद्राची, परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri police commissioner vinay kumar choubey inspected polling stations ahead of lok sabha election pune print news ggy 03 css