पिंपरी : ‘ट्रुथ अँड डेअर’ गेम खेळताना १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार रावेत येथे उघडकीस आला आहे. आयुष आनंद भोईटे (वय २०, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), सुशील बालन्द्र ठाकूर (वय २२, रा. बापदेवनगर, देहूरोड), रितिक संजय सिंग (वय २५, रा. बापदेवनगर, देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पीडित मुलगी मूळची राजगुरूनगर येथील असून, ‘नीट’ परीक्षेची तयारी करण्याकरिता पिंपरीत एकटीच भाडेतत्त्वावर राहते. पाच वर्षांपूर्वी तिची कोंढवा येथे राहणाऱ्या एका ‘रिल स्टार’ मुलीशी समाजमाध्यमातून ओळख झाली. ‘रील स्टार’ मुलगी पीडित मुलीच्या खोलीवर एक दिवस राहण्यासाठी आली. काही वेळाने मी मित्राकडे जाऊन येते, असे सांगून रावेतला मित्र भोईटे याच्याकडे गेली. भोईटे आणि तिने मद्य प्राशन केले. त्यानंतर मध्यरात्री भोईटे याचे दोन मित्र पीडित मुलीलाही रावेत येथे घेऊन आले.
हेही वाचा :पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण आणखी वाढले; १३ जण व्हेंटिलेटरवर तर २४ जण आयसीयूत दाखल
पीडित, ‘रील स्टार’ आणि इतर आरोपींनी पुन्हा मद्य प्राशन केले. त्यानंतर त्यांनी ‘ट्रुथ अँड डेअर’ गेम खेळायला सुरुवात केली. आरोपी भोईटे याने प्रथम ‘रिल स्टार’बरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने त्याने पीडित मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलीने घडलेला प्रकार घरी सांगितला. पहाटेच्या सुमारास पीडित मुलीच्या आई-वडिलांनी पिंपरीत धाव घेतली. मुलीकडे चौकशी केल्यानंतर कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीडित मुलीची चौकशी करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे.