पिंपरी : मोरवाडीतील मोकळ्या जागेवरील औद्योगिक कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण झाल्याने आणि आग विझविण्यासाठीचा खर्च देण्यासाठी महापालिकेने जागामालकाला नोटीस बजाविली आहे. अमृतेश्वर ट्रस्टचे विश्वास चिताराव यांना १० लाखांचा दंड भरण्याचा आदेश दिला आहे. मोरवाडी अमृतेश्वर कॉलनी येथील ३६/१०/५७ येथील मोकळी जागा ही अमृतेश्वर ट्रस्टची आहे. या मोकळ्या जागेत औद्योगिक क्षेत्रातील रबर, प्लॅस्टिक, टायर, ड्रम व इतर भंगार साहित्य टाकले होते. या औद्योगिक कचऱ्याला २१ फेब्रुवारी रोजी मोठी आग लागली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी १३ अग्निशामक बंब अपुरे पडले होते.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन, आरोपीला अटक
आग तीन दिवस धुमसत होती. माती टाकून आग विझविण्यात आली. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात विषारी धूर निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. मोकळ्या जागेत औद्योगिक कचरा जमा केल्याने आणि आगीस कारणीभूत ठरल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. त्यामुळे जागामालकास १० लाखांचा दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड मालमत्ता करात समाविष्ट केला जाणार आहे. जागामालक असलेल्या पुण्यातील अमृतेश्वर ट्रस्टला प्रत्यक्ष जाऊन नोटीस बजाविली आहे. दहा लाखांचा दंड भरण्याचा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.