पिंपरी : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून बोलत असल्याचे भासवून नळजोड तोडण्याच्या भीतीने ज्येष्ठाची दोन लाख ६५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार निगडीत उघडकीस आला आहे. याबाबत रतनलाल मुरलीधर शर्मा (वय ७६, रा. यमुनानगर, निगडी) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शर्मा यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून चालू महिन्याचे पाण्याचे देयक अद्ययावत नसल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नळजोड तोडला जाणार असल्याची भीती दाखवली. अधिकारी दिवेश जोशी यांना संपर्क करण्यास सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपींनी शर्मा यांना समाजमाध्यमावर ‘पाइपलाइन वॉटर अपडेट’ नावाने फाइल पाठवली. ती डाउनलोड करण्यास भाग पाडून शर्मा यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यांच्या खात्यातून दोन लाख ६५ हजार ५०९ रुपये काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.

पाणी पुरवठा बंद करण्याबाबत खोटे ‘एसएमएस’

महापालिका पाणी पुरवठा विभाग यांच्या नावाने पाणी पुरवठा बंद करण्यात येत असल्याचे बनावट एसएमएस पाठवण्याचे प्रकार शहरामध्ये घडत आहेत. नागरिकांनी अशा बनावट एसएमएसकडे दुर्लक्ष करावे. तसेच बनावट एसएमएस पाठवणाऱ्या क्रमांकाची तक्रार सायबर पोलिसांकडे करावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. महापालिका कार्यक्षेत्रात सध्या ज्या मालमत्तेची पाणीपट्टी थकीत आहे, अशा मालमत्तेचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे. याशिवाय थकीत पाणीपट्टी भरण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘एसएमएस’ द्वारे व इतर माध्यमातून करण्यात येत असते. परंतु सध्या महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या नावाने विविध मोबाईल क्रमांकावरून बनावट एसएमएस पाठवण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा एसएमएसकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.