पिंपरी : तळवडे येथील केकवर लावायच्या शोभेच्या फटाक्याच्या (स्पार्कल कँडल) मेणबत्ती कंपनीतील स्फोटातील जखमींपैकी एका मुलीसह दोघींचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या ११ झाली आहे. प्रियंका यादव (वय ३२) यांचे रात्री पावणे दोन वाजता तर अपेक्षा तोरणे (वय १८) यांचे सकाळी साडे सहा वाजता ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान निधन झाले आहे.
तळवडे तेथील मेणबत्ती कंपनीत आठ डिसेंबर रोजी घडलेल्या आग दुर्घटनेत सहा महिलांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तर दहा जण जखमी झाले होते. जखमींना पुढील उपचारांसाठी तातडीने पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यातील प्रतिक्षा तोरणे (वय १६) आणि कविता राठोड (वय ४५) यांचे नऊ डिसेंबर रोजी तर शिल्पा राठोड (वय ३१) यांचे दहा डिसेंबर रोजी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तर, उर्वरीत जखमींपैकी गुरुवारी दोन महिलांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यामुळे तळवडे आग दुर्घटनेतील आतापर्यंतच्या मृतांची संख्या ११ इतकी झाली आहे.
हेही वाचा : पिंपरी : आठ मुली, वंशाला दिवा नाही, दुसऱ्या लग्नाचा विचार; पत्नीने दिली पतीची सुपारी…केले २० ते २१ वार
या घटनेतील जखमी रुग्ण उषा पाडवी, सुमन गोंधळे, कोमल चौरे, रेणुका ताथोड आणि शरद सुतार यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या प्रकृतीविषयी आयुक्त शेखर सिंह विशेष लक्ष ठेवून आहेत. तसेच वेळोवेळी या रुग्णांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेत आहेत. उपचारासाठी दाखल असलेल्या तळवडे आग दुर्घटनेतील जखमी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक मदतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ससून रुग्णालयामध्ये मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि दोन मदतनीस यांची चोवीस नेमणूक करण्यात आली आहे.