पिंपरी : उन्हाचा चटका वाढला असून, पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना धरणातील पाणीसाठा कमी हाेऊ लागला आहे. सध्या ६३.९२ टक्के पाणीसाठा असून, हा पाणीसाठा १५ जूनपर्यंत पुरेल एवढा आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराला मागील साडेपाच वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. शहराची लाेकसंख्या वाढत असल्यामुळे पाण्याची मागणीही सातत्याने वाढू लागली आहे. मावळातील पवना धरणातून ५१०, आंद्रा धरणातून ८०, एमआयडीसीकडून २० असे ६१० दशलक्ष लीटर (एमएलडी) एका दिवसाला शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. भामा आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लिटर पाणी आणण्याचे नियाेजन आहे. त्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामाला वेग आला असून, डिसेंबर २०२५ अखेर या जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याचा मानस महापालिका प्रशासनाचा आहे.

मागील काही दिवसांपासून शहर आणि मावळातील पवना धरण परिसरात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. पाण्याची मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. उन्हामुळे बाष्पीभवनही होत आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी घटू लागली आहे. पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), मावळ तालुक्यातील काही ग्रामपंचायत व नगरपरिषदेला पाणी दिले जाते. सध्या पवना धरणात ६३.९२ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत धरणात ६२.९१ टक्के पाणीसाठा हाेता. त्यामुळे यंदा गतवर्षापेक्षा १.१ टक्के इतका अधिक पाणीसाठा धरणात शिल्लक असून, शहरवासीयांना सध्यातरी पाण्याची चिंता नाही. दरम्यान, आंद्रा धरणातूनही महापालिका पाणी घेत असून, या धरणात ६५ टक्के पाणीसाठा आहे.

पवना धरणात ६३.९२ टक्के पाणीसाठा आहे. हा साठा १५ जुलैअखेरपर्यंत पुरेल. उन्हाचा चटका वाढू लागला आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते. त्यामुळे नागरिकांनी आतापासून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी केले.