पिंपरी : पक्षातील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एके काळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरावर लक्ष केंद्रित केले असताना आता मध्यवर्ती कार्यालयेही समोरासमोर असणार आहेत. दोन्ही गटांच्या कार्यालयांमध्ये केवळ पुणे-मुंबई महामार्ग असणार आहे. यामुळे दोन्ही गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना-भाजपाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी एके काळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरावर लक्ष्य केंद्रित केले. शहरातील पक्ष संघटना, आमदार, बहुतांशी माजी नगरसेवकांनीही त्यांना साथ दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शहरात लक्ष घातले. नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याकडे शहराची जबाबदारी सोपविली. रोहित यांनी सातत्याने शहराचे दौरे सुरू करत भविष्यातील संघर्षांची चुणूक दाखविली. शहरातील ज्येष्ठ नेते, माजी महापौर आझम पानसरे यांना आपल्या गटात ओढले. पानसरे यांनी साथ दिल्याने पक्षात राहिलेल्या पदाधिकाऱ्यांना लढण्याचे बळ मिळाले. वर्गणी काढत काळेवाडीत प्रशस्त असे पक्षाचे जनसंपर्क कार्यालय उभारले होते; मात्र शहराध्यक्ष तुषार कामठे यांना पसंत पडले नाही. त्यामुळे काळेवाडीतील कार्यालय बंद केले.

हेही वाचा – आजी-माजी राष्ट्रपतींची पुण्यात अनोखी भेट

हेही वाचा – पुण्यात समान पाणीपुरवठा योजनेतूनच पाणीचोरी… पाणीचोरांनी अशी लढवली शक्कल

आता पिंपरी चौकात मध्यवर्ती कार्यालय उभारले आहे. या कार्यालयाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते २ डिसेंबर रोजी उद्घाटन केले जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे हे देखील उपस्थित असणार आहेत. तर, पक्षाचे जुने कार्यालय अजित पवार यांच्या गटाकडे असून, ते खराळवाडीत आहे. जुन्या पुणे-मुंबई महार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्यावर खराळवाडीत अजित पवार गटाचे तर महामार्गावरुन निगडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिंपरीत शरद पवार यांच्या गटाचे कार्यालय आहे. दोन्ही पक्षांची कार्यालये समोरासमोर असणार आहेत. त्यामुळे भविष्यात दोन्ही गटांतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले, की कार्यकर्ते, नागरिकांना सोईस्कर होईल असे मध्यवर्ती कार्यालय उभारले आहे. या कार्यालयातून शहवासीयांची कामे मार्गी लावली जातील.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri the offices of both groups of ncp are facing each other pune print news ggy 03 ssb
Show comments