पिंपरी : थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेत पडदा काढण्यासाठी शिडीवर चढलेला १२ वर्षीय विद्यार्थी पाय घसरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत मनोज भीमराव म्हस्के (३८, थेरगाव) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिला शिक्षिका आणि सफाई कर्मचा-या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हस्के यांच्या शिव शक्ती फाउंडेशन संचालित स्पंदन बाल आश्रमात राहणारा १२ वर्षीय मुलगा थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेत शिकत आहे. त्याला शिक्षिका आणि सफाई कर्मचारी यांनी शाळेतील पडदा काढण्यासाठी शिडीवर चढवले. शिडीवरून पाय घसरून मुलगा खाली पडला. त्याच्या दोन्ही हाताला मार लागला आहे. त्या तो गंभीर जखमी झाला आहे. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.
तळेगाव दाभाडे येथे आग प्रात्यक्षिकात तरुण भाजला
रामनवमी निमित्त तळेगाव दाभाडे येथे काढलेल्या मिरवणुकीत आगीसंबंधी प्रात्यक्षिक दाखवत असताना एक तरुणाला भाजल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलीस अंमलदार कृष्णा कातकडे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनवमी निमित्त तळेगाव दाभाडे येथे मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये तलवारबाजी आणि आगीसंबंधी प्रात्यक्षिक करण्यास पोलिसांनी बंदी घातली होती. तरी देखील आगीबाबत प्रात्यक्षिक करण्यात आले. हे प्रात्यक्षिक करत असताना एकाच्या चेहऱ्याला भाजले. यामध्ये तो जखमी झाला. याप्रकरणी आयोजक आणि प्रात्यक्षिक सादर करणारा अशा दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
कंपनीतील चालकाने केली वाहनाची चोरी
कंपनीत चालक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने मोटार चोरून नेल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे ५ एप्रिल रोजी घडली.अनिल केशवदास गंगवाणी (५१, पिंपरी) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा गंगवाणी यांच्या कंपनीत चालक म्हणून काम करतो. त्याच्या ताब्यात तीन लाख ५० हजार रुपये किमतीची मोटार गंगवाणी यांनी दिली होती. त्याने ती मोटार चोरून नेली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
रावेतमध्ये विनाकारण मारहाण, दोघांना अटक
काहीही कारण नसताना दोघांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (७ एप्रिल) पहाटे साडेतीन वाजता रावेत येथे घडली.
धनंजय जतीन साहू (३८, निगडी) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक चव्हाण (२६, देहूरोड), वैभव उर्फ बंटी शिंदे (२५, आकुर्डी) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनंजय हे हॉटेल बंद करून त्यांच्या सहकाऱ्यासोबत घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवले. काहीही कारण नसताना आरोपींनी धनंजय यांचा सहकारी शुभम याला मारहाण केली. याबाबत जाब विचारला असता आरोपींनी धनंजय यांना देखील मारहाण केली. धनंजय हे गंभीर जखमी झाले आहेत. रावेत पोलीस तपास करीत आहेत.