पिंपरी : शहरातील मुख्य चौकांमध्ये लावण्यात आलेल्या ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी करून गेल्या अकरा महिन्यांमध्ये ४१ हजार ६९५ बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याद्वारे तीन कोटी चार लाख २५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य चौकांमध्ये २५० ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात आले होते. परंतु, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी ‘सीसीटीव्ही’ फुटेज पाहण्याची व्यवस्था नव्हती. त्यानंतर स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत शहरात साडेतीन हजार ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात आले. त्याच्या जोडणीचे काम ऑगस्ट २०२२ मध्ये पूर्ण झाले. तेव्हापासून स्मार्ट सिटीच्या निगडी येथील कार्यालयातून वाहन चालकांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. पांढऱ्या आणि काळ्या पट्ट्यावर ( झेब्रा क्रॉसिंग) उभी राहणारी वाहने, एका दुचाकीवरून तिघे जण प्रवास करणारे, सीट बेल्ट न वापरणारे चारचाकी वाहनचालक, नो-एन्ट्रीतून येणारी वाहने, वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल) तोडणाऱ्या वाहनांवरील कारवाईला आता वेग आला आहे. सीसीटीव्हीद्वारे कारवाईसाठी पाच पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा : दोन्ही बंडात साथ देणारा आमदार मंत्रिपद न मिळाल्याने अजितदादांवर नाराज; अधिवेशन सोडून परतले मतदारसंघात
स्मार्ट सिटी प्रकल्पातील साडेतीन हजार कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत. भ्रमणध्वनीवर संदेश पाठवून कारवाईची माहिती दिली जात आहे. १ जानेवारी २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ या अकरा महिन्यांच्या कालावधीत ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून ४१ हजार ६९५ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली आहे. यातून तीन कोटी चार लाख २५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. कारवाईसाठी एक अधिकारी आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुढील काळात कारवाईची व्याप्ती आणखी वाढविण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी सांगितले.