पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांतून पिंपरी-चिंचवड पोलीस दलात बदल्या झालेल्या १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या विविध पोलीस ठाण्यात, गुन्हे शाखेत नेमणुका करण्यात आल्या आहेत. याबाबत उपआयुक्त माधुरी केदार-कांगणे यांनी आदेश प्रसृत केले आहेत. नागपूर, सोलापूर, ठाणे यासह विविध पोलीस दलातून काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या पिंपरी-चिंचवड पोलीस दलात नुकत्याच झाल्या होत्या. हे अधिकारी पोलीस दलात हजर झाले होते. पण, त्यांना नेमणुका देण्यात आल्या नव्हत्या. या पोलीस अधिकाऱ्यांच्या आता नेमणुका करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : पिंपरी : बारणे-वाघेरेंमध्ये ‘गद्दारी’वरून आरोप-प्रत्यारोप
त्यामध्ये पोलीस निरीक्षक अशोक कडलग (पिंपरी पोलीस ठाणे), शत्रुघ्न माळी (निगडी), निवृत्ती कोल्हटकर (वाकड), कन्हैया थोरात (हिंजवडी), प्रदीप रायन्नावार (तळेगाव दाभाडे), अंकुश बांगर (तळेगाव एमआयडीसी), जितेंद्र कोळी (चिंचवड), प्रमोद वाघ (चाकण), नितीन गीते (महाळुंगे एमआयडीसी), विजय वाघमारे (देहूरोड पोलीस ठाणे) तसेच सुहास आव्हाड, गोरख कुंभार, संदीप सावंत यांना गुन्हे शाखेत नेमणूक दिली आहे. दरम्यान, गृह विभागाने गुरुवारी सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये धुळ्यातील शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांची पिंपरी-चिंचवड शहरात सहायक पोलीस आयुक्तपदी बदली केली आहे.