पिंपरी : रागाने बघितल्याच्या कारणावरून चौघांनी एका तरुणावर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना जुनी सांगवी येथे घडली. अनिष धनंजय ढवळे (वय २१, रा. जुनी सांगवी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विराज काटे (वय २०, रा. औंध) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर, त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिष हे जुनी सांगवी येथे भेळ खात थांबले होते. तिथे आरोपी आले. रागाने बघत असल्याच्या संशयावरून आरोपींनी अनिष यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात अनिष गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी कुऱ्हाड हवेत फिरवून दहशत निर्माण केली. पोलिसांनी विराज काटे याला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

तरुणावर कोयत्याने वार

पूर्ववैमनस्यातून दोघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना रहाटणी येथे घडली. विश्वजित रणजित वाघमारे (वय १९, रा. रहाटणी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप शिवाजी राजपांगे (वय १९), राहुल सीताराम वाघमारे (वय १८, दोघे रा. रहाटणी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वजित शनिवारी सायंकाळी त्यांच्या घरी जात होते. त्यांना आरोपींनी रस्त्यात अडवले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी ‘हा प्रवीण दरेकर सोबत असतो. याची आज विकेट टाकली पाहिजे.’ असे म्हणत विश्वजित यांच्यावर कोयत्याने वार केले. हल्ल्यात विश्वजित खाली पडले असता आरोपींनी त्यांना सिमेंटच्या गट्टूने मारून गंभीर जखमी केले. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

पाय लागल्याने तरुणास मारहाण

पिंपरी : रस्त्याने जात असताना पाय लागल्याने तिघांनी तरुणाला मारहाण केल्याची घटना स्पाईन रोड, चिखली येथे घडली. संतोष सुरेश खोब्रागडे (वय २६, रा. चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष चिखली येथे रस्त्याने पायी चालत जात होते. वाहन दुरुस्ती दुकानात काम करणाऱ्या एकाला संतोष यांचा पाय लागला. त्या कारणावरून आरोपींनी संतोष यांना बेदम मारहाण केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.