पुणे : मध्य प्रदेशातून गोव्यात गांजाची विक्री करण्यासाठी निघालेल्या दोघांना खडकी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक लाख ६० हजारांचा दहा किलो गांजा जप्त करण्यात आला. जाबीर भिकन खाटीक (वय ३२, रा. वाघाडी, ता. शिरपूर, जि. धुळे), सोहेलअली जहीरअली शाह (वय २६, रा. चोपडा, जि. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. धुळे जिल्ह्यातून शिरपूर येथून दोघे जण एसटी बसमधून गांजा घेऊन गोव्यात विक्रीसाठी निघाल्याची माहिती खडकी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी ऋषीकेश दिघे यांना मिळाली. अमली पदार्थ तस्कर जाबीर आणि सोहेलअली मुंबई-पुणे रस्त्यावत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा चर्च चौकात सापळा लावला.

पोलिसांच्या पथकाने दोघांना पकडले. त्यांच्याकडून दहा किलो गांजा जप्त केला. दोघे जण एसटी बसमधून पुण्यात आले होते. पुण्यातून ते बसने गोव्यात गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती तपासात मिळाली. दोघांनी मध्य प्रदेशातून गांजा आाणल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन चोरमले, उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ, आशिष पवार, संदेश निकाळजे, प्रताप केदारी यांनी ही कामगिरी केली.

हेही वाचा : चिंचवडमधून अजित दादांच्या शिलेदाराचे बंड शमले; नाना काटेंची निवडणुकीतून माघार

पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. गेल्या वर्षभरापासून पुणे पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात कारवाई करुन गांजा, मेफेड्रोन असे अमली पदार्थ जप्त केले. पुणे परिसरातील कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीत छापा टाकून पोलिसांनी साडेतीन हजार कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. पुण्यातून मेफेड्रोन दिल्ली, चंदीगड, तसेच देशभरात विक्रीसाठी पाठविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

Story img Loader