पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत रिक्त जागांचा टक्का वाढल्याचे दिसून येत आहे. यंदा अकरावीच्या ४२ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षण विभागातर्फे अकरावीची प्रवेश प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली. यंदा ३४३ कनिष्ठ महाविद्यालयांतील एकूण १ लाख २० हजार ८०५ जागांसाठी अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. त्यात १ लाख ४ हजार १६० जागा केंद्रीभूत प्रवेशांसाठी, तर १६ हजार ६४५ जागा राखीव कोट्यासाठी उपलब्ध होत्या. या अंतर्गत तीन नियमित फेऱ्या, सहा विशेष फेऱ्या राबवण्यात आल्या. तसेच दैनंदिन गुणवत्ता फेरीही राबवण्यात आली. यातून एकूण ७८ हजार ६१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. त्यापैकी ९४०० कोट्यातील जागांवर, तर ६९ हजार २१८ प्रवेश केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे झाले. त्यामुळे ४२ हजार १८७ जागा रिक्त राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीभूत प्रवेशांच्या ३४ हजार ९४२, तर राखीव कोट्याच्या ७ हजार २४५ जागा रिक्त राहिल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येत आहे. झालेल्या प्रवेशांमध्ये कला शाखेत ७ हजार ३९०, वाणिज्य शाखेत २९ हजार ८१९, विज्ञान शाखेत ३९ हजार ६४३, तर व्यवसाय अभ्यासक्रमासाठी १ हजार ७६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा: ससूनमध्ये चार कोटींचा घोटाळा, तेरा आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला
गेल्या काही वर्षांत अकरावीच्या प्रवेशाचा टक्का सातत्याने कमी होत आहे. दरवर्षी सुमारे ३० हजारांहून अधिक जागा रिक्त राहतात. महाविद्यालयांना मान्यता, तुकडीवाढ अशा कारणांनी अकरावी प्रवेशासाठीच्या जागाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्या तुलनेत प्रवेश होत नाहीत. या तफावतीचा परिणाम जागा रिक्त राहण्यावर होत असून, दरवर्षीच रिक्त जागांचा टक्का वाढत असल्याचे दिसून येत आहे.