पुणे : राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा ताण सहन न झाल्याने एका विद्यार्थ्याने दुसऱ्या मजल्यावरील परीक्षा कक्षातून उडी मारली. नऱ्हे येथील परीक्षा केंद्रात मंगळवारी ही घटना घडली. बारावीची परीक्षा इंग्रजी विषयाने सुरू झाली. यंदा परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी राज्य मंडळासह शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासनाकडून कठोर उपायोजना करण्यात आल्या आहेत.
पुणे विभागीय मंडळाचे सचिव औदुंबर उकिरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी नऱ्हे येथील परीक्षा केंद्रात परीक्षा सुरू झाल्यावर अर्ध्या तासाने एका विद्यार्थ्याने दुसऱ्या मजल्यावरील परीक्षा कक्षातून खाली उडली मारली. आधी तो पहिल्या मजल्यावर पडला. त्यानंतर त्याने पुन्हा उडी मारली. या वेळी शिक्षण विभागाचे भरारी पथक संबंधित परीक्षा केंद्रात होते. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उडी मारल्याने जखमी झालेल्या संबंधित विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परीक्षेचा ताण सहन न झाल्याने विद्यार्थ्याने उडी मारल्याचेही त्यांनी सांगितले.