पुणे : परवानाधारक बंदुक विक्रीच्या दुकानातून कामगारांनीच तब्बल ३२ बोअर आणि पिस्तुलाची २० काडतुसे चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर त्यांच्या मुसक्या गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनने दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. अदित्य चंदन मॅकनोर (वय २२) आणि सुमित राजू कांबळे (वय २८, दोघेही रा. कॅम्प, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत अज्ञान फिरोज बंदूकवाला (रा. बोहरी आळी, रविवार पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

फिर्यादी बंदूकवाला यांचे रविवारी पेठेतील बोहरी आळीमध्ये परवानाधारक पिस्तूल आणि बंदुक विक्रीचे दुकान आहे. येथून बंदुकीसाठी लागणार्‍या बोअरची आणि पिस्तुलासाठी लागणार्‍या काडतुसाची विक्री होते. याच दुकानात अदित्य मॅकनोर नावाचा मुलगा कामाला होता. जलद पैसे कमविण्यासाठी त्याने दुकानातून तब्बल ३२ बोअर आणि २० काडतुसांची चोरी केली. हा प्रकार दुकान मालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अदित्य हा त्याचा मित्र सुमित कांबळे याच्या मदतीने काडतुसे विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची आणि ती विक्री करणार असल्याची माहिती युनिट दोनचे पोलीस अमंलदार अमोल सरडे यांनी मिळाली. त्यानुसार दोघांनाही कॅम्प परिसरातून ताब्यात घेण्यात आले. यावेळी दोघांकडून चोरी करण्यात आलेली बोअर आणि काडतुसे जप्त करण्यात आली.

हेही वाचा : टाटा समूहात नोकरीची संधी! वॉक-इन इंटरव्ह्यूचे वेळापत्रक अन् इतर निकष जाणून घ्या…

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक नितीन कांबळे, अमंलदार उज्ज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, नागनाथ राख, साधना ताम्हाणे यांच्या पथकाने केली. उपनिरीक्षक शिवराज हाळे पुढील तपास करत आहेत.