पुणे : येरवडा भागातून दुचाकीस्वार तरुणीचे अपहरण करुन तिला मोटारीतून गुजरातमध्ये नेल्याचे उघडकीस आले आहे. गुजरातमधील गोध्रा परिसरात तरुणीला डांबून ठेवण्यात आले. प्रसाधनगृहात जाण्याची बतावणी करून तरूणीने सुटका करून घेतली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कमल नावाची महिला, तसेच पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २४ वर्षीय तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी हडपसरमधील मगरपट्टा सिटीत खासगी कंपनीच्या कार्यालयात काम करते. ५ नोव्हेंबर रोजी ती दुपारी अडीचच्या सुमारास विमानतळ रस्त्यावरील संजय पार्क परिसरातून निघाली होतीत. त्या वेळी तेथून जाणाऱ्या रिक्षाचालकाने दुचाकीस्वार तरुणीला अडवले. पाठीमागून आलेल्या मोटारीतून दोन जण उतरले आणि तरुणीला धमकावून मोटारीत बसण्यास सांगितले.
हेही वाचा : पुणे: पश्चिम भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद
आरोपींनी तरुणीचा चेहरा कापडाने झाकला. मोटारीत तिला इंजेक्शनमधून गुंगीचे ओैषध दिले. त्यानंतर तिला एका खोलीत डांबून ठेवले. त्या वेळी तेथे कमलाबाई नावाची एक महिला होती. ‘तेरा दुसरी जगह सौदा करने वाले है. इसको संभालके ले जाना’, असे आरोपींना सांगितले. त्यानंतर तरुणीला मोटारीतून गुजरातला नेले. गुजरातमधील गोध्रा परिसरात तरुणीने मोटार थांबविण्यास सांगितले. प्रसाधनगृहात जाण्याची बतावणी तिने केली. तरुणीचे हात दोरीने बांधले होते. तरुणीने दोरी सोडविली. रस्त्याच्या कडेला असलेल्या दाट झाडीतून ती पळाली. त्यानंतर आरोपींनी तिचा पाठलाग केला. तरुणीने आरोपींना गुंगारा दिला. त्यानंतर पुन्हा महामार्गावर आली. तेथील नागरिकांशी तिने संपर्क साधला. पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. गुजरातमधील पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा : पुणे: वारजे भागात टोळक्याने वाहने पेटवली
तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिने दिलेल्या तक्रारीत अत्याचार झाल्याचे म्हटले नाही. वैद्यकीय तपासणीसाठी तरुणीला ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञाचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यात येत आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रीकरणाची पडताळणी करण्यात येत आहे, असे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार वारंगुळे यांनी सांगितले.