पिंपरी : दुसर्याच्या प्रेमात पडल्याचा संशयातून हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञाननगरीत काम करणार्या अभियंता तरुणीचा प्रियकराने निर्घृणपणे खून केल्याचे समोर आले आहे. प्रियकराने पिस्तुलातून पाच गोळ्या झाडून प्रेयसीचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न झाले आहे. लखनौवरून हिंजवडीत येऊन त्याने प्रेमाचा शेवट केला. वंदना के. द्विवेदी (वय २६) असे खून झालेल्या अभियंता तरूणीचे नाव आहे. सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ऋषभ राजेश निगम (रा. लखनौ) याला अटक करण्यात आली आहे. वंदना आणि ऋषभ हे दोघेही महाविद्यालयात असताना एकमेकांवर प्रेम करत होते. वंदनाने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. ती हिंजवडी येथे इन्फोसिस कंपनीत काम करीत होती. ती कंपनीच्या जवळच एका वसतिगृहात राहत होती. ऋषभ हा लखनौमध्ये जमिनीच्या व्यवहाराच्या दलालीचे काम करत होता. दोघेही फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होते. पण, वंदना अपेक्षित संवाद करत नसल्याचे ऋषभला वाटत होते. त्यातून ती अन्य कोणाच्या तरी प्रेमात पडल्याचा संशय त्याला होता. त्यावरून त्यांच्यात गेल्या चार वर्षांपासून वाद सुरू होते.
हेही वाचा : मावळ लोकसभा ‘आप’ने लढविण्यासाठी केजरीवालांना साकडे
ऋषभने चार-पाच वर्षांपूर्वीच एका मित्राकडून पिस्तुल घेऊन ठेवले होते. मनातील संशय वाढत असल्याने ऋषभ २५ जानेवारी रोजी लखनौवरून हिंजवडीत आला. त्याने ओयो टाऊन हाऊस हॉटेलमध्ये खोली बूक केली. वंदना २६ जानेवारी रोजी सायंकाळी लॉजमध्ये ऋषभ याला भेटली. भेटून ती पुन्हा आपल्या वसतिगृहात परतली. ऋषभने दुसर्या दिवशी वंदनाला पुन्हा बोलावून घेतले. दोघांनी एकत्र खरेदी केली. सोबत जेवणही केले. २७ जानेवारी रोजी दिवसभर दोघेही एकत्र होते. रात्री साडेनऊच्या सुमारास दोघेही लॉजच्या खोलीत असताना ऋषभने पिस्तुल काढून वंदनाला काही कळायच्या आत पाच गोळ्या झाडल्या.
हेही वाचा : मोठी बातमी : मराठा सर्वेक्षणावर आता मागासवर्ग आयोगाचा वॉच
वंदना रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर ऋषभ हा काही घडलेच नाही, असे दाखवत रात्री दहाच्या सुमारास खोलीचा दरवाजा बंद करून पसार झाला. तो मुंबईच्या दिशेने निघाला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी नाकाबंदीत त्याच्यावर संशय आल्याने पिशवी तपासली असता त्यात पिस्तुल आढळले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हिंजवडीतील घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी हिंजवडी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांच्या पथकाने मुंबईत जाऊन ऋषभ याला ताब्यात घेतले. ससून रूग्णालयात झालेल्या शवविच्छेदन अहवालात वंदनावर पाच गोळ्या झाडल्याचे निष्पन्न झाले.