पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढी पाडवा सणाच्या मुहूर्तावर पुणे शहरात तब्बल १० हजार १७० वाहनांची खरेदी झाली. यामध्ये सर्वाधिक सहा हजार ५१० दुचाकी, तर दोन हजार ४२४ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नवीन वाहन खरेदीकडे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल अडीच हजारांहून अधिक (२८ टक्के) वाढ पुणे शहर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) नोंदवली. गेल्या वर्षी (२०२४ ) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सात हजार ३३६ वाहनांची नोंदणी झाली होती, तर २०२३ मध्ये, पाडव्याच्या मुहूर्तावर सात हजार ७०६ वाहनांची नोंदणी झाली.
दरवर्षी गुढी पाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा हे तीन आणि दिवाळी पाडवा अर्ध महुर्त अशा साडेतीन मुहूर्तावर गृह, सोने किंवा वाहन खरेदी केली जाते. प्रत्येकाला एकाच मुहूर्तावर खरेदी करायची असल्याने बाजारात उत्पादक कंपन्यांकडूनही आगाऊ आरक्षण करून घेण्यात येते. त्यानुसार यंदा वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला असल्याचे दिसून येते. यंदाच्या वर्षी देखील वाहन खरेदी वाढ होत असून यंदा विक्रमी वाहन खरेदी झाली आहे.
पाडव्याचा मुहूर्त आणि वाहनांची प्रतीक्षा यामुळे खरेदीदारांनी महिनाभरापूर्वीच वाहनांची नोंदणी करून ठेवली. त्यानुसार वाहन खरेदीची प्रक्रिया निश्चित केल्यानंतर आरटीओ’तून नोंदणी क्रमांक आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वाहन विक्री केंद्रांतून पाठविलेल्या अर्जांनुसार १० हजार १७० कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे, असे आरटीओ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. मागील दोन वर्षांच्या (२०२३ आणि २०२४) तुलनेत वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला असल्याचे आरटीओ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विशेषत: पर्यावरणपूरक आणि कमी खर्चीक असलेल्या इलेक्ट्रीक, सीएनजी तसेच एमएनजीएल अशी वेगवेगळी वाहने असून निरनिराळ्या उत्पादक कंपन्यांनी पर्याय उपलब्ध करून दिल्याने आपसूकच नागरिकांचा कल अशा वाहनांकडे कल वाढला आहे. त्यामुळे वाहनखरेदीला चालना मिळत ग्राया वाहनांना पसंती दिल्याचे आरटीओ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुणेकरांचा दुचाकी वाहनांसाठी सर्वाधिक कल आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दोन हजार २२९ दुचाकी जास्त खरेदी करण्यात आल्या आहेत. २०२४ मध्ये पाडव्याला चार हजार २२१ दुचाकी खरेदी करण्यात आल्या होत्या, तर यंदा सहा हजार ५१० दुचाकी खरेदी करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ चारचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडे पुणेकरांचा कल वाढला आहे. त्यानुसार अनुक्रमे ९८ आणि २७२ वाहने मागील वर्षापेक्षा जास्त खरेदी करण्यात आले आहेत.
स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे</strong>
दोन वर्षात झालेली वाहनांची खरेदी
वाहन प्रकार- २०२४ – २०२५
दुचाकी – ४,२२१ – ६,५१०
चारचाकी (कार) – २,३२६ – २,४२४
मालवाहतूक – २४५ – ५१७
रिक्षा – २५७ – २८३
बस – ४५ – ६८
व्यावसायिक चारचाकी – १९० – २३४
अन्य वाहने – ५२ – १३४
एकूण – ७,३३६ – १०,१७०