पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने ५ जानेवारी २०२३ या तारखेच्या आधी निवडणूक जाहीर केल्यास तब्बल ३० हजार पुणेकर मतदानापासून वंचित राहणार आहेत. त्याचे कारण मतदारयादी आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यास नेमकी कोणती मतदारयादी वापरायची, याचा निर्णय प्रशासनाला घेता आलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मतदारयादी तयार करण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असते. दरवर्षी देशभरातील प्रत्येक जिल्ह्यातील मतदारांची मतदारयादी प्रसिद्ध होत असते. मात्र, लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांच्या काळात या मतदारयादीला महत्त्व प्राप्त होत असते. या कार्यक्रमानुसार ५ जानेवारी २०२३ रोजी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील मतदारांची मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातील वडगाव शेरी (चार लाख ३३ हजार २२), शिवाजीनगर (दोन लाख ७४ हजार १०३), कोथरूड (तीन लाख ९१ हजार ५२०), पर्वती (तीन लाख ३० हजार ८१९), पुणे कॅन्टोन्मेंट (दोन लाख ६७ हजार ४८०) आणि कसबा पेठ (दोन लाख ७५ हजार ४२८) मतदार होते.

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुण्यातील विश्वविक्रमाचे कौतुक

नव्या वर्षाच्या सुरुवातीला देशभरात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होणार आहे. त्याची तयारी जिल्हा निवडणूक शाखेने सुरू केली आहे. त्यानुसार मतदारयादी अद्ययावतीकरणाचा कार्यक्रमही हाती घेतला आहे. २८ ऑक्टोबर रोजी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील मिळून एकूण २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये २७ हजार ५० मतदार नव्याने मतदार समाविष्ट झाले आहेत. तसेच प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एक लाखांपेक्षा जास्त मतदार नोंदणीचे अर्ज जिल्हा निवडणूक शाखेला प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातील नव्या मतदारांचेही अर्ज आहेत. त्यामुळे २७ हजार ५० मतदारांमध्ये आणखी नव्या मतदारांची भर पडणार आहे.

हेही वाचा : पुणे : मध्यवर्ती शासकीय इमारतीसमोर कर्मचाऱ्यांची निदर्शने

या पार्श्वभूमीवर ५ जानेवारी २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीत वापरण्यात येणारी मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच पुणे लोकसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यास ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली मतदारयादी वापरण्यात येईल. परिणामी पुणे लोकसभा मतदारसंघातील नव्याने मतदार झालेल्या सुमारे ३० हजार मतदारांना मतदानाला मुकावे लागणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune 30 thousand voters can not vote if the by poll declared before 5 january pune print news psg 17 css