पुणे : हडपसर भागातील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका महिलेने फ्लॅटमध्ये तब्बल ३५० मांजरी घरात पाळल्याचे समोर आले आहे. एकाच फ्लॅटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मांजरी आढळून आल्याने खळबळ उडाली असून येत्या ४८ तासांत मांजरी हलविण्यात याव्यात, अशी नोटीस संबधित सदनिकाधारकांना पुणे महापालिकेच्या पशू संवर्धन अधिकाऱ्यांनी बजावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील नवव्या मजल्यावर मागील ५ वर्षांपासुन तब्बल ३५० मांजरी पाळण्यात आल्या आहेत. या मांजरीची देखभाल करण्यास त्यांनी ५ ते ६ कामगार ठेवले आहेत. त्या मांजरीच्या विष्ठेचा, आवाजाचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.याबाबत सोसायटीमधील नागरिकांनी सदनिका धारकांकडे तक्रार केली. रहिवाशांच्या तक्रारीकडे त्यांनी काही लक्ष दिले नाही.त्यावर रहिवाशांनी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावर, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पण संबधीत व्यक्तीनी त्यांना देखील कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. त्यावर अखेर हडपसर पोलिसांना याबाबत माहीती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन फ्लॅटची पाहणी केली. त्यावेळी त्या फ्लॅटमध्ये ३५० मांजरी असल्याचे आढळून आले. सोसायटीमधील रहिवाशांची तक्रार लक्षात घेऊन, मांजरी पाळणार्या संबधीत सदनिकाधारकांना ४८ तासात मांजरी हलविण्यात यावे,याबाबतची नोटीस पुणे महापालिकेच्या पशू संवर्धन अधिकाऱ्यांकडून बजाविण्यात आली आहे.