पिंपरी : लाकडी दांडके, लोखंडी सळईने मारहाण करत सहा जणांचे टोळके डुकरे भरलेला टेम्पो घेऊन पसार झाले. ही घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास महाळुंगे येथे घडली. याप्रकरणी किशोर संपत साबळे (वय ३९, रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजकुमार महेंद्र रीडलान (वय ३१, रा. झेंडेमळा, देहूरोड), समाधान पांडुरंग राठोड (वय ३२, रा. निघोजे, खेड), राम मदन मोठे (वय ३१, रा. खराबवाडी) आणि सोमनाथ अंकुश येळवंडे (वय ४१, रा. निघोजे, खेड) यांना अटक करण्यात आली आहे. तर, त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : पिंपरी महापालिकेच्या अर्जांच्या रकान्यात आता तृतीयपंथीयांनाही स्थान
फिर्यादी साबळे यांनी मोटारीतील काही डुकरे मोकळी सोडली होती. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी फिर्यादीला लाकडी दांडके, लोखंडी सळईने मारहाण केली. डुकरे भरलेली मोटार, मोबाइल फोन असा नऊ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले. फौजदार जाधव तपास करत आहेत.