पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (एनबीटी) १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत ‘पुणे पुस्तक महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात चार विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी ही माहिती दिली. वाचन संस्कृती वृद्घिंगत करण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव होत आहे. महोत्सवात विविध भाषांतील पुस्तकांची दोनशे दालने असणार आहेत. तसेच अनेक मान्यवर लेखक, कलाकार, राजकीय नेतेही या महोत्सवात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महोत्सवात चार विश्वविक्रम नोंदवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हेही वाचा : ‘सरकारी काम सहा महिने थांब’ म्हणणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना वकिलांचा दणका; जाणून घ्या नेमके प्रकरण
त्यात गुरुवारी (१४ डिसेंबर) सकाळी आठ वाजता स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना वाचन करून दाखवण्याचा उपक्रम होईल. १५ डिसेंबरला फर्ग्युसन महाविद्यालयात जास्तीत जास्त पुस्तकांनी भारत हा शब्द साकारला जाणार आहे. १६ डिसेंबरला ‘जयतू भारत’ या वाक्यात जास्तीत जास्त पुस्तकांचा समावेश असेल. तर अधिकाधिक लोकांनी मोठ्याने वाचण्याच्या व्हिडिओ अल्बमचा उपक्रम २१ डिसेंबरला होईल.
हेही वाचा : थंडीमुळे सांधे जास्त दुखताहेत? साध्या सोप्या उपायांनी मिळवा आराम
युनेस्कोच्या निकषांनुसार जागतिक पुस्तकांची राजधानी बनण्याची क्षमता पुणे शहरात आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या उद्देशाने हे उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे पांडे यांनी सांगितले. १४ डिसेंबरला ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमात महापालिकेचा सहभाग आहे. त्यात महापालिकेच्या शाळा, क्षेत्रीय कार्यालये, रुग्णालय अशा ठिकाणी दुपारी बारा ते एक या वेळेत वाचन करण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.