पिंपरी : पिंपळे निलख येथील संरक्षण हद्दीतील रक्षक चौक ते गावठाणातून जाणाऱ्या १८ मीटर रस्त्यावर भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. या कामास अडथळा ठरणारी ४० झाडे तोडण्यात आली आहेत. सांगवी फाटा ते रावेत बीआरटीएस मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पिंपळे निलख येथील रक्षक सोसायटी चौकात भुयारी मार्ग (सब-वे) उभारण्यात येणार आहे. भुयारी मार्गाच्या कामात अडथळा ठरणारी झाडे काढण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने परवानगी दिली आहे. त्यानुसार नऊ रेनट्री, काटेरी बाभूळ, सहा बोर, आठ शिसू, एक सुबाभूळ, तीन ग्लेरीसिडीया, एक शिरस तीन इतर अशी एकूण ४० झाडे तोडण्यात आली आहेत. तर, पाच पिंपळ, एक कॅशिया, दोन भेंडी, कडूलिंब, एक कांचन, दोन तपशी अशा १३ झाडांचे पुनर्रोपन करण्यात येणार आहे. त्या झाडांंचे पुनर्रोपन केल्यानंतर अहवाल सादर करावा लागणार आहे.
हेही वाचा : पुणे: कात्रज भागात १२ लाखांचे मेफेड्रोन जप्त
वाहतूक कोंडी सुटणार
पिंपळेनिलख मधून बाणेर, बालेवाडी भागात जाता येते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हिंजवडीतील माहिती व तंत्रज्ञाननगरीतील कर्मचारी या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे वाहनांची संख्या वाढून रक्षक सोसायटी चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाययोजना म्हणून भुयारी मार्ग उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या १८ मीटर रस्त्यास भुयारी मार्ग उभारण्यासाठी सात कोटी ६२ लाख आठ हजार २१३ रुपये दराची निविदा प्रक्रिया महापालिकेने राबवली होती. सर्वांत कमी दराची पाच कोटी ७३ लाख १० हजार ८०६ रुपये दराची एचसी कटारिया कंपनीची निविदा स्वीकारली आहे.
रक्षक सोसायटी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्याचे नियोजन आहे. या कामाला अडथळा ठरणारी झाडे उद्यान विभागाची परवानगी घेवून तोडल्याचे उपअभियंता सुनील शिंदे यांनी सांगितले.