पुणे : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तरुणाच्या अंगावर मोटार घालून त्याचा खून करण्यात आल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव परिसरात घडली. याप्रकरणी एका महिलेसह दोघांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली. साबीर मोहम्मद शफी ब्यापारी (वय ४५, रा. पणसुंबा पेठ, जुन्नर, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अभिजीत सोनवणे (वय २८, रा. डिंगोरे, ता. जुन्नर), जेबा इराफान फकीर (वय ३२, रा. पणसुंबा पेठ, ता. जुन्नर) यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
साबीर आणि जेबा दोघे विवाहित आहेत. साबीर तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. दोघे शेजारी राहायला आहेत. जेबा जुन्नर तालुक्यातील कांदळी ओैद्योगिक वसाहतीत कामाला होती. नोकरीनिमित्त जुन्नरहून ती दररोज कांदळीला जायची. अभिजीत जुन्नर तालुक्यात शेतजमीन मोजणीचे काम करतो. प्रवासादरम्यान जेबा आणि अभिजीतची ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबतची माहिती साबीरला मिळाली होती. अभिजीत आणि त्याच्यात वादही झाला होता. गुरुवारी (११ एप्रिल) रमजाननिमित्त अभिजीत तिच्या घरी आला होता. त्यावेळी साबीर आणि अभिजीतमध्ये पुन्हा वाद झाला.
हेही वाचा : धक्कादायक : मोबाइलवर चित्रफीत काढून महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार; तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
शुक्रवारी (१२ एप्रिल) सकाळी जेबा बसमधून कामाला निघाली होती. साबीरने तिचा पाठलाग केला. तिने अभिजीतच्या मोबाइलवर संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. दुपारी दोनच्या सुमाारास साबीर पुणे-नाशिक महामार्गावरील अयोध्या हाॅटेलजवळ थांबला होता. अभिजीत तेथे मोटारीतून आला. भरधाव मोटार साबीरच्या अंगावर घातली. मोटारीच्या चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर जुन्नर परिसरातील पणसुंबा पेठ परिसरात तणाव निर्माण झाला. नागरिकांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी अभिजीतसह जेबाला अटक केली आहे. उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक महादेव शेलार तपास करत आहेत.