पुणे : डिजिटल बँकिंगच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हेगार प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना फसवण्याचा आणि त्यांची संवेदनशील वित्तीय माहिती चोरण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. याचबरोबर फसवणुकीच्या घटनांपासून दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.
आजच्या डिजिटल बँकिंग युगात सायबर सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, कारण सायबर गुन्ह्यांचे स्वरूप सतत बदलत आहे. फसवणूक, डेटा चोरी आणि ऑनलाइन गैरप्रकारांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यास बँकेचे सर्वोच्च प्राधान्य आहे. प्रगत सुरक्षा प्रणाली, फसवणूक ओळखण्याचे तंत्र आणि सतत ग्राहक जागरूकता उपक्रमांच्या माध्यमातून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी महाबँक कटिबद्ध आहे. नवीन सुरक्षा पद्धतींचा अवलंब करून आणि सुरक्षित बँकिंग पद्धतींचे प्रोत्साहन देऊन बँक ग्राहकांना विश्वासार्ह आणि सुरक्षित बँकिंग अनुभव देत आहे, असे महाबँकेने म्हटले आहे.
महाबँकेच्या ५ टिप्स
१) बनावट संदेशांपासून सावध रहा. फसवणूक करणारे बनावट एसएमएस पाठवतात आणि तुमचे खाते ब्लॉक करण्यात आले आहे किंवा आधार तपशील आणि केवायसी त्वरित अद्ययावत करणे आवश्यक आहे, असे भासवतात. हे स्मिशिंग प्रकार आहेत. ते तुम्हाला आर्थिक गोपनीय माहिती शेअर करण्यास प्रवृत्त करतात. अशा संदेशांना उत्तर देऊ नका किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
२) पडताळणी न केलेल्या एपीके फाइल डाउनलोड करू नका. अनोळखी स्रोतांवरून एपीके (अँड्राईड अॅप्लिकेशन) फाइल डाउनलोड करू नयेत. कारण त्यामध्ये मालवेअर व्हायरस असू शकतो. तो तुमची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती धोक्यात आणू शकतो.
३) पडताळणी न केलेल्या पेमेंटच्या लिंकवर क्लिक करू नका. फसवणूक करणारे भ्रामक लिंक पाठवतात आणि त्यात पेमेंट विनंती किंवा तातडीच्या आर्थिक सूचना असल्याचे दर्शवतात. अशा लिंक्सवर क्लिक केल्यास आर्थिक माहिती आणि पैशांचे नुकसान होऊ शकते. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी अशा संदेशांची सत्यता पडताळा.
४) बनावट ग्राहक सेवा क्रमांकांपासून सावध राहा. सायबर गुन्हेगार गुगल सर्च, अनोळखी वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोटे ग्राहक सेवा क्रमांक प्रकाशित करतात जेणेकरून ग्राहकांना फसवता येईल. ग्राहक सेवा संपर्काची खातरजमा केवळ अधिकृत वेबसाइटवरूनच करा.
५) कधीही कोणासोबतही तुमचे खाते लॉगिन तपशील, कार्ड माहिती, पिन, पासवर्ड किंवा ओटीपी शेअर करू नका.