पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात एका ५३ वर्षीय मेंदूमृत व्यक्तीचे अवयव दान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आणि तीन जणांना नवे आयुष्य प्राप्त झाले. प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. एका ५३ वर्षीय व्यक्तीच्या मेंदूमध्ये रक्तस्राव होत असल्याने त्याला १४ सप्टेंबर रोजी वैद्यकीय उपचारासाठी डीपीयू प्रायव्हेट सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही, रुग्णाच्या अडचणींत वाढ झाली.
उपचारानंतर डॉक्टरांनी मेंदू मृत घोषित केला. यानंतर रुग्णाच्या कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे तीन जणांचा जीव वाचला आहे. संबंधित रुग्णाचा मेंदू मृत घोषित करण्यात आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांचे अवयव दानाविषयी समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाकडून संमती मिळाल्यावर संबंधित रुग्णाचे यकृत, दोन मूत्रपिंड आणि दोन नेत्रपटल दान करण्यात आले.
हेही वाचा : पुणे : गणेश विसर्जनासाठी ४० घाटांवर दोनशेहून अधिक कचरावेचक दिमतीला
डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे झालेल्या शस्त्रक्रियेत ५५ वर्षीय रुग्णाला यकृत आणि ३३ वर्षीय रुग्णाला एक किडनी प्रत्यारोपित करण्यात आली. तर, दुसरी किडनी पुण्यातील एका रुग्णालयाला देण्यात आली. नेत्रपटलही गरजूंसाठी दान करण्यात आले. हे सर्व अवयवदान पुणे आणि महाराष्ट्र विभागाच्या राज्य वाटप धोरणानुसार करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
हेही वाचा : मी अजितदादा विरोधात कधीच भूमिका मांडणार नाही – सुप्रिया सुळे
‘अवयव दान करून तीन व्यक्तींना जीवनदान दिल्याबद्दल त्या कुटुंबातील सदस्यांची आभारी आहे. अवयवदात्याच्या या मानवतेच्या कृतीमुळे अनेक रुग्णांचा जीव वाचला आहे. प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांची प्रकृती सुधारत आहे’, असे डॉ. वृषाली पाटील यांनी म्हटले आहे.