पुणे : शहराचा वाढता विस्तार, गुन्हेगारी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन गृह विभागाने पुुणे शहरात सात नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली. त्यासाठी ६० कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. नवीन पोलीस ठाण्यांतील कामकाजासाठी ८१६ पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आठवडाभरात सातही ठिकाणी कामकाजास सुरुवात होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी दिली.

पुणे पोलिस आयुक्तालयात आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी ही नवीन पोलिस ठाणे सुरू होणार आहेत. त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. नव्याने पोलिस ठाणे सुरू करण्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यांसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने प्राधान्य दिले आहे. वाढती लोकसंख्या, गुन्हेगारी, विस्तार विचारात घेऊन पुण्यात नवीन सात पोलीस ठाणी सुरू करण्यास मान्यता दिल्याने पोलीस ठाण्यांवर पडणारा कामकाजाचा ताण कमी होईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले.

हेही वाचा : पुणे मेट्रोचा अजब कारभार! मेट्रोच्या तिकिटापेक्षा वाहनतळ शुल्कच जास्त

नवरात्रोत्सवात कामकाजास सुरुवात

नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीमुळे कामकाजाची विभागणी होईल, तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत होईल. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे. दसऱ्यापूर्वीच नवीन पोलीस ठाण्यांचे कामकाज सुरू होईल. गेले तीन ते चार वर्षे नव्या पोलीस ठाण्यांसाठी पाठपुरावा करण्यात येत होता. बंडगार्डन पाेलीस ठाण्यात नवीन इमारत बांधण्यात येणार असून, २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पुण्यातील नवीन पोलीस ठाणी (कंसात उपलब्ध झालेला निधी)

  • खराडी पोलीस ठाणे (सात कोटी ५० लाख)
  • फुरसुंगी पोलीस ठाणे (आठ कोटी ८१ लाख)
  • नांदेड सिटी पोलीस ठाणे (आठ कोटी ६० लाख)
  • वाघोली ठाणे ( आठ कोटी ७५ लाख)
  • बाणेर पोलीस ठाणे (आठ कोटी ६० लाख)
  • आंबेगाव पोलीस ठाणे ( सात कोटी ९ लाख)
  • काळेपडळ पोलीस ठाणे (दहा कोटी २४ लाख)

हेही वाचा : वनराज आंदेकर खून प्रकरणात आणखी काहीजण सामील, खुनापूर्वी आरोपींकडून गोळीबाराचा सराव

शहरात नवीन तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे

शहरात नवीन दोन हजार ८८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. त्यासाठी ४३३ कोटी रुपयांच्या निधीलाही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त अरविंद चावरिया, सहायक आयुक्त विवेक पवार यांनी सीसीटीव्ही कॅमेेरे बसविण्यासाठी पाठपुरावा केला.