पिंपरी : चाकण-शिक्रापूर मार्गावर १६ जानेवारी रोजी भरधाव कंटेनरच्या धडकेत जखमी झालेल्या मुलीचा गुरुवारी पिंपरीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. धनश्री अंबादास गाढवे ( वय ७, रासे, खेड) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनश्री आईबरोबर १६ जानेवारी रोजी दुचाकीवरून चालली होती. त्या वेळी भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्या तिघीही जखमी झाल्या. धनश्री हिच्यावर पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी उपचारादरम्यान धनश्री हिचा मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांच्या मोटारीसह दहा वाहनांना धडक देणारा कंटेनर चालक अकिब अब्दुल रज्जाक खान (वय २५, रा. पलवल, हरियाणा) याच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे आणि अपघात करणे असे दोन गुन्हे चाकण पोलीस ठाण्यात दाखल आहेत. शिक्रापूर पोलीस ठाण्यातही अपघाताचा गुन्हा दाखल आहे. एका डंपरला धडक दिल्यानंतर कंटेनर बंद पडला. नागरिकांनी अकिबला बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अकिबवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयातून सोडल्यानंतर चाकण पोलिसांनी त्याला अटक केली.

हेही वाचा :Pune VVIP Visits : पुण्यात ‘व्हीव्हीआयपीं’चा राबता; पंतप्रधान, राष्ट्रपतींसह अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचे ८५३ दौरे; पोलीस प्रशासनावर ताण

जखमी झालेल्या मुलीचा मृत्यू झाल्याने अपघाताच्या गुन्ह्यात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची कलमवाढ केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले. दरम्यान, चालक अकिबने मद्यप्राशन केले नसल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले आहे. मारहाण झाल्याने घाबरून त्याने कंटेनर बेफामपणे चालविल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune 7 year old girl died in container accident on chakan shikrapur road pune print news ggy 03 css