पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या पक्षीनिरीक्षणातून महाविद्यालयाच्या आवारात ८१ प्रजाती आढळून आल्या आहेत. त्यात स्थानिक पक्ष्यांसह युरोपातून स्थलांतर करून आलेल्या पक्ष्यांचाही समावेश असून, २०२३मध्ये केलेल्या गणनेच्या तुलनेत यंदा सात प्रजाती कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे.
ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट या जागतिक उपक्रमाचा भाग म्हणून या वर्षी १४ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत पक्षी गणना करण्यात आली. त्यामध्ये ६८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कॅर्निल लॅब ऑफ ऑर्निथॉलॉजी आणि नॅशनल ऑडुबॉन सोसायटी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. या निरीक्षणांमध्ये ८१ प्रकारच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. त्यासाठी २१८६ निरीक्षणे ॲपद्वारे नोंदविण्यात आली. उपक्रमात देशभरातून ६६ हजार निरीक्षणे नोंदवून १०८६ प्रजातींचे दस्तऐवजीकरण केले गेले, तर राज्यात पाच हजारहून अधिक निरीक्षणांद्वारे ४०० प्रजातींची नोंदवण्यात आल्या.
‘हे पक्षी खूप प्रवास करून भारतात येतात. त्यांचा आकार छोटा असतो. प्रवासादरम्यान त्यांचे वजन कमी होते. या कालावधीत युरोपात बर्फ आणि थंडी असते. त्यांना खाद्य मिळत नाही. ते सुरक्षितता आणि खाण्यापिण्यासाठी योग्य अधिवासाच्या शोधात असतात. जैववैविध्याने संपन्न असलेल्या फर्ग्युसनच्या आवारात ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान पक्षी वास्तव्य करतात,’ असे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी महाजन यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, ‘तांबट (कॉपरस्मिथ बार्बेट) हा पक्षी वारंवार आपल्या घरट्याकडे येताना निरीक्षणात दिसला. तो जमिनीपासून १० ते १२ फूट उंचीवरील वाळलेल्या खोडावर खालच्या बाजूने घरटे बनवितो. त्याबरोबर घार, पोपट, मैना, वेडा राघू, स्वर्गीय नर्तक, तांबोली, शिपाई बुलबुल, घुबड हे स्थानिक पक्षी मोठ्या संख्येने आढळले. तर, ग्रीन वॉर्बलर, रेड ब्रेसेड फ्लायकॅचर, ट्री पपेट असे युरोपातून स्थलांतर करून आलेले पक्षीही निदर्शनास आले.’
‘हवामान बदलामुळे पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. शहरीकरणामुळे अधिवास गमावला जात असल्याने पक्षी संकटात आहेत. अशा परिस्थितीत जागृती करण्यासाठी पक्षिगणनेसारखा उपक्रम प्रेरणादायी वाटला. या उपक्रमामुळे पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण झाली. विज्ञान, सर्जनशीलता, कौशल्याचा वापर करता आला. शिक्षणाला कृतीशील उपक्रमाची जोड मिळाली,’ अशी भावना सिद्धांत म्हात्रे, मुस्कान श्रीवास्तव या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
दोन वर्षांत सात प्रजाती कमी!
महाविद्यालयाने २०२३मध्ये केलेल्या पक्षिगणनेमध्ये ८८ प्रजाती आढळल्या होत्या. मात्र, यंदा ८१ प्रजातींची नोंद करण्यात आली. त्यामुळे दोन वर्षांत सात प्रजाती कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. ‘महाविद्यालयातील पक्षी गणना केवळ चार दिवसांचीच होती. त्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांचा अनुभव, प्रजाती ओळखण्याची क्षमता अशा घटकांचा परिणाम लक्षात घेतला पाहिजे. प्रजातींची संख्या घटण्यामागे काही जैविक बदल आहेत का, नैसर्गिक भिन्नता आहे का, हे समजून घेण्यासाठी दीर्घकालीन आणि वर्षभर विदा संकलन करून बदलांतील नेमकेपणा टिपता येईल,’ असे स्पष्ट करण्यात आले.