पुणे : पुण्यातील नावलौकिक सर्वदूर पसरला आहे. देश आणि राज्य पातळीवर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा राबता पुण्यात वाढला आहे. २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन वेळा पुणे भेटीवर आले होते, तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही पुण्यास एकदा भेट दिली होती. गेल्या वर्षी पुणे शहरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे ८५३ दौरे झाले. २०२३ च्या तुलनेत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यात दुपटीने वाढ झाली आहे.
पुणे शहराचा विस्तार वाढत आहे. देश पातळीवर अनेक महत्त्वाच्या संशोधन, लष्करी संस्था, उद्योग पुण्यात आहेत. राजकीय घडमोडी, तसेच विविध राजकीय कार्यक्रमांस राजकीय नेत्यांकडून उपस्थिती लावली जाते. गेल्या वर्षी पुण्याच्या नावलौकिकात भर घालणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील जी २० परिषद पार पडली. या परिषदेस जगभरातील उच्चपदस्थ अधिकारी, उद्योजकांनी उपस्थिती लावली. परिषदेच्या निमित्ताने पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरात येणाऱ्या उच्चपदस्थ, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्ताची जबाबदारी पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडे असते. विशेष शाखेकडून बंदोबस्ताची आखणी, तसेच सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जातो. पुणे शहरात गेल्या वर्षी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे ८५३ दौरे झाले, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन वेळा पुणे दौऱ्यावर आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही पुण्यास भेट दिली होती. २०२३ मध्येही पंतप्रधान आणि राष्ट्रपती पुणे भेटीवर आले होते.
हेही वाचा :नवी मुंबईतील धर्तीवर पुण्यातही ‘सायबर लॅब’, सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी अत्याधुनिक यंत्रणा
पुण्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे
वर्ष | राष्ट्रपती | पंतप्रधान | झेड प्लस सुरक्षा | झेड सुरक्षा | वाय प्लस सुरक्षा | वाय सुरक्षा |
२०२४ | १ | २ | ३२२ | २८ | ४३९ | ६१ |
२०२३ | १ | १ | १९१ | १७ | १७१ | १२ |