पिंपरी : शहरातील बेकायदा रूफटॉप हॉटेलवर (गच्चीवरील हॉटेल) महापालिका प्रशासनाने कारवाईस सुरुवात केली आहे. चार दिवसांत नऊ रूफटॉप हॉटेलवर हातोडा मारण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त विजय सरनाईक यांनी दिली. नियमांचे पालन करणाऱ्यांना अधिकृत परवानगी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड शहरात वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळेगुरव, थेरगाव या भागांत रूफटॉप हॉटेलची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. इमारतीच्या गच्चीवर कोणतीही परवानगी न घेता हे हॉटेल बेकायदेशीरपणे चालविले जात आहेत. शहरातील खवय्ये व मद्यपी मोठ्या संख्येने अशा हॉटेलना प्राधान्य देत आहेत. त्याठिकाणी मोठमोठे किचन असतात मात्र, त्यासाठी आवश्यक ते परवाने घेतले जात नव्हते. गच्चीवर अनधिकृत बांधकाम करून रूफटॉप हॉटेल बांधण्यात आली असताना कारवाई न करता त्यांना अधिकृत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या होत्या. यामुळे प्रशासनावर टीका झाल्याने बेकायदेशीर रूफटॉप हॉटेलवर कारवाईस सुरुवात केली आहे.

हेही वाचा : पुणे : नमो ११ सूत्री कार्यक्रमाअंतर्गत ७३ आश्रमशाळांमध्ये विज्ञान केंद्र

त्यानुसार ड क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सात, तर ग क्षेत्रीय कार्यालय हद्दीत दोन अशा नऊ हॉटेलवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. शहरातील काही हॉटेलचालकांकडे महापालिकेचा बांधकाम परवाना, अग्रिशमन विभागाचा ना-हरकत दाखला नाही. तसेच, महापालिकेचा बिगरनिवासी मिळकतकरही भरला जात नाही. त्यामुळे महापालिकेचे दरवर्षी कोट्यवधींचे आर्थिक नुकसान होत आहे.

हेही वाचा : मराठा समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य; छगन भुजबळ यांना कायदेशीर नोटीस

शहरातील विविध भागांत ४८ रूफटॉप हॉटेल असल्याची माहिती अग्निशमन विभागाने गेल्या महिन्यात दिली होती. आता मात्र ड आणि ग क्षेत्रीय कार्यालय हद्दीमध्येच रूफटॉप हॉटेल असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ड क्षेत्रीय कार्यालय परिसरातच २१ रूफटॉप हॉटेल आढळून आले आहेत. या बेकायदेशीर असलेल्या रूफटॉप हॉटेलवर कारवाई केली जाणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune 9 illegal rooftop hotels destroyed by pimpri chinchwad municipal corporation in last 4 days pune print news ggy 03 css
Show comments