पुणे : हाताला काम नसल्याची ओरड एकीकडे होत असताना पुणे जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत तब्बल ९७ हजार मजुरांनी नोंदणी केली आहे. मात्र, प्रत्यक्ष कामावर केवळ ८५१ मजूर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मजूर गेले कुठे?, या प्रश्नाने जिल्हा प्रशासन बुचकाळ्यात पडले आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीत पाण्याच्या अभावामुळे शेतीची कामे नसल्याने गावागावांत रोजगारीचा प्रश्न निर्माण होतो. या स्थितीवर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने रोहयो अंतर्गत सार्वजनिक कामे करून गावात रोजगार निर्माण करण्यात येतात. जूनमध्ये पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतीची काम सुरू होतात. यामुळे रोहयोच्या कामावरील मजूर कमी होतात. मात्र, यंदा विलंबाने दाखल झालेल्या मोसमी पावसाने सरासरीदेखील गाठली नाही. परिणामी राज्यभरात दुष्काळी स्थिती ओढवली आहे.
हेही वाचा : पुणे : मिळकतकरात ४० टक्के सवलतीसाठी आज शेवटचा दिवस… अर्ज स्वीकारण्याची ‘या’ ठिकाणी व्यवस्था
त्यामुळे कामाच्या शोधासाठी राज्याच्या विविध भागांतून नागरिकांचे पुण्यात स्थलांतर होण्याची शक्यता गृहित धरून जिल्हा प्रशासनाने रोहयो अंतर्गत कामे उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे कामे उपलब्ध असताना प्रत्यक्ष कामावर मजूर नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या पाहणीत लक्षात आले आहे. ‘सध्या रोहयो अंतर्गत पुणे जिल्ह्यात २१४ कामे उपलब्ध असून, त्यावर ८५१ मजूर कार्यरत आहेत. ९७ हजार ३७५ मजुरांची जॉब कार्ड सक्रिय आहेत. उन्हाळ्यात मजुरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे’ असे रोहयोच्या उपजिल्हाधिकारी दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : पिंपरी : मोठ्याने शिव्या दिल्याचा विचारला जाब; पेट्रोल टाकून महिलेची जाळली दुचाकी…
कामे कोणती उपलब्ध?
रोजगारासाठी रोहयो अंतर्गत रस्ता बनवणे, पाणंद रस्ते तयार करणे, माती नालाबांध बनवणे, वनराई बंधारा, सामूहिक शेततळी, गाव तलाव, साठवण तलाव, जैविक बंधारा, खारजमीन विकास बंधारा, पाझर तलावातील गाळ काढणे, रोपवाटिका, कालव्याची दुरुस्ती, नूतनीकरण व अस्तरीकरण, सिंचन विहीर अशी सार्वजनिक कामे केली जातात. या गावांमध्ये रोहयोमार्फत जलसंधारणाची कामे करण्यात येतात. या कामांमुळे भविष्यात गावातील दुष्काळीस्थिती दूर होण्यास मदत होते. रोहयोतून यापूर्वी २७२ रुपये मजुरी मिळत असे, ती आता ४४७ रुपये करण्यात आली आहे.