बांधकाम करारानुसार पाच कोटी ३५ लाख आणि हात उसने घेतलेले ५२ लाख ६५ हजार रुपये परत न करता प्रकल्पातील सदनिकेची परस्पर विक्री करून गुंडांमार्फत गाळ्यांचा ताबा घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी माजी नगरसेवकासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी माजी नगरसेवक फारूख यासीन सय्यद इनामदार (रा. महम्मदवाडी), अफान इनामदार आणि अमितकुमार सिन्हा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक राहुल प्रेमप्रकाश गोयल (वय ३८, रा. ढोले पाटील रोड) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोयल बांधकाम व्यावसायिक आहेत. फारुख इनामदार यांच्या मालकीची जमीन विकसनासाठी गोयल यांना देण्यात आली होती. आरोपींनी गोयल यांना विकास हस्तांतरण हक्क ( टीडीआर) विकत घेऊन न दिल्यामुळे बांधकामास विलंब होऊन गोयल यांचे आर्थिक नुकसान झाले. गोयल यांनी पुणे महापालिकेकडे वाढीव चटई क्षेत्र खरेदीसाठी अर्ज केला. अर्ज मंजूर झाल्यानंतर आरोपी महापालिकेत गेले आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन हरकत घेतली. गोयल यांच्या कामात अडथळा निर्माण करुन त्यांची फसवणूक केली.
पाच कोटी ३५ लाख आणि हातउसने घेतलेले ५२ लाख परत दिले नाही –
गोयल यांना बांधकाम करारानुसार ठरल्याप्रमाणे पाच कोटी ३५ लाख आणि हातउसने घेतलेले ५२ लाख परत दिले नाही. गोयल यांच्या प्रकल्पातील काही सदनिकांची दस्त नोंदणी करून परस्पर विक्री केली. प्रकल्पाच्या ठिकाणी गुंड पाठवून बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचे गोयल यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय मोगले तपास करत आहेत.