पुणे: छत्रपती शिवाजी रस्त्यावर मद्यधुंद मोटारचालकाने मंगळवारी रात्री एकापाठोपाठ पाच वाहनांना धडक दिली. नागरिकांनी मोटारचालकाचा पाठलाग करून त्याला शिवाजीनगर भागातील दीपबंगला चौकात पकडले. चतु:शृंगी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी खडक पोलिसांच्या ताब्यात दिले.
दयानंद केदारी असे ताब्यात घेण्यात आलेल्या मोटारचालकाचे आहे. छत्रपती शिवाजी रस्त्यावर प्यासा हॉटेलसमोर मोटारचालक केदारीने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. अपघातानंतर तो पसार झाला. त्यावेळी त्याने एकापाठोपाठ चार ते पाच वाहनांना धडक दिली. एका दुचाकीस्वाराने त्याचा पाठलाग सुरू केला. मोटारचालक शिवाजीनगर भागातून दीपबंगला चौकात गेला. दुचाकीस्वाराने त्याला पाठलाग करुन पकडले. त्याने या घटनेची माहिती त्वरीत चतु:शृंगी पोलिसांन दिली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करुन पुढील कायदेशीर कारवाईसाठी खडक पोलिसांच्या ताब्यात दिले, अशी माहिती चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी दिली.
हेही वाचा : ‘आयटी’त पुण्याचा झेंडा! सॉफ्टवेअर निर्यातीत मुंबई, नागपूरपेक्षा अव्वल कामगिरी
मोटारचालक केदारी एका उपाहारगृहात व्यवस्थापक आहे. तो दारुच्या नशेत मोटार चालवित होता. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला नोटीस बजाविण्यात आली आहे, अशी माहिती खडक पोलिसांनी दिली.