शिरुर : कारेगाव , ता शिरुर येथे रात्रीच्या वेळी मामेभाउ व बहिण असे दोघे गप्पा मारत असताना दोन जणांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत तरुणीकडील सोन्याचे दागिने काढून घेऊन तीच्यावर दोघा जणांनी अतिप्रसंग केल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी अमोल नारायण पोटे (वय २५) रा. संस्कृती डेव्हलपर्स पवार बिल्डींग, कारेगाव ता. शिरुर जि. पुणे मुळ (रा. ढोकराई फाटा, ता. श्रीगोदा जि. अहील्यानगर) आणि किशोर रामभाऊ काळे (वय २९) रा. संस्कृती डेव्हलपर्स, लेन नं.१, कारेगाव ता. शिरुर जि.पुणे मुळ (रा. किल्ले धारूर, ता.धारुर जि. बीड) अशा दोन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.

यासंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संबधित तरुणी आणि तिचा मामेभाऊ रात्रीच्या वेळी घराच्या काही अंतरावर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी दोन जण आले. त्यांनी संबधित तरुणी आणि तिच्या मामे भावाला त्यांच्याकडील चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. जबरदस्तीने एकमेकांना चुंबन व शरीर संबध करण्यास भाग पाडले आणि त्यांच्याकडील मोबाईलमध्ये फोटो व व्हिडीओ शुटींग काढून घेतले. त्यानंतर संबधित तरुणीच्या मामे भावाला त्यातील एकाने थोड्या अंतरावर नेले आणि त्यापैकी एकाने पीडितेवर अतिप्रसंग केला. त्याच्यानंतर दुसऱ्याला बोलावून घेऊन पहिला युवक मामेभावाकडे गेला. त्यानंतर दुसऱ्याने संबधित तरुणीवर अतिप्रसंग केला आणि तरुणीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करून निघून गेले.

या नंतर संबधित तरुणीने घरी जाऊन घडलेला सर्व प्रकार बहिणीस सांगितला. बहिणीच्या पतीने डायल ११२ वर कॉल करुन सदर प्रकारची माहीती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी अमोल नारायण पोटे आणि किशोर रामभाऊ काळे या दोघांना ताब्यात घेतले. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. आरोपीना शिरुर न्यायालयात हजर केले असता ७ मार्च २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली .