पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची मोबाइलवर चोरुन छायाचित्रे काढणाऱ्या एकाविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अजित अरुण शिंगोटे (वय ३१, रा. ओैंदुबर सहवास सोसायटी, शनिवार पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करते. शनिवार पेठेतील एका सोसायटीत तरुणी आणि मैत्रिणींनी सदनिका भाडेतत्त्वावर घेतली आहे. शिंगोटे या परिसरातील एका इमारतीत राहायला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंगोटे खिडकीत थांबून तरुणी आणि मैत्रिणींकडे पाहत होता. खिडकीत थांबून तो मोबाइलवर चित्रीकरण करत होता. ही बाब तरुणी आणि तिच्या मैत्रिणीस समजली. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर तपास करत आहेत.

मोबाइलवर तरुणींची छायाचित्रे, तसेच चित्रीकरण करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. नकळत मोबाइलवर चित्रीकरण करून चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करण्याच्या घटना घडल्या आहेत. असे प्रकार करणाऱ्यांची माहिती त्वरीत पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा : पंतप्रधानांची सभा झालीच नाही; पण मैदानाची झाली दुर्दशा!

मोबाइलवर संपर्क साधून महिलेला त्रास

महिलेच्य मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून तिला त्रास देणाऱ्या साताऱ्यातील एकाला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. जहाँगीर नदाफ (वय ४०, रा. उंब्रज, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सिंहगड रस्ता भागात राहायला आहे. नदाफ महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. गेल्या काही दिवसांपासून तो महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधून तिला त्रास देत होता. महिलेशी अश्लील भाषेत संवाद साधत होता. नदाफच्या त्रासामुळे अखेर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मालुसरे तपास करत आहेत.

Story img Loader