पुणे : एटीएम केंद्रामधून रक्कम काढून देण्याच्या बहाण्याने चोरट्याने हातचलाखी करीत एकाला ५० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. टिळक रस्ता परिसरातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम केंद्रामध्ये २ सप्टेंबर रोजी ही घटना घडली असून याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा : पुणे: गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडले, ३८ किलो गांजा जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भवानी पेठेत वास्तव्यास असून २ सप्टेंबर रोजी कामानिमित्त टिळक रस्त्यावर आले होते. त्याठिकाणी ते भारतीय स्टेट बॅंकेच्या एटीएम केंद्रामधून पैसे काढण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी आलेल्या एकाने त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने रक्कम काढून देण्याची बतावणी केली. हातचलाखी करीत त्याने एटीएम कार्ड बदलून घेत, तक्रारदारकडून पिन क्रमांक घेतला. रक्कम निघत नसल्याचे सांगत, त्याने दुसरेच कार्ड तक्रारदार यांना दिले. त्यानंतर त्याने वेळोवेळी संबंधित चोरलेल्या एटीएम कार्डचा वापर करून बँक खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतले. बचत खात्यातून रक्कम कमी झाल्याचा मेसेज आल्यानंतर तक्रारदाराला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात घेऊन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस तपास करत आहेत.