पुणे : रस्त्यावर होणाऱ्या किरकोळ वादातून मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकीस्वार तरुणाने अचानक ब्रेक मारल्याने मोटारीतील तिघांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना विश्रांतवाडीतील धानोरी भागात घडली.
उमेश विठ्ठल काळे (वय ३०, रा. भैरवननगर, धानोरी, विश्रांतवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मोटारीतील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. काळे यांनी याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार उमेश आजोबांना मामाकडे सोडण्यासाठी निघाले होते. धानोरीतील डाॅ. आंबेडकर शाळेजवळ अचानक एका मोटारचालकाने ब्रेक दाबला. मोटार थांबल्याने पाठीमागून येणारे दुचाकीस्वार उमेश यांनी ब्रेक दाबला. मोटारीच्या पाठीमागे दुचाकीस्वार उमेश थांबले. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या मोटारचालकाने काळे यांना शिवीगाळ केली. अचानक ब्रेक का मारला ? अशी विचारणा करून मोटारीतील तिघांनी त्यांना शिवीगाळ सुरू केली.काळे यांना गजाने मारहाण केली. शिवीगाळ करून मोटारचालकासह तिघेजण पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक पाडेकर तपास करत आहेत.
हेही वाचा >>>पुणे : कर्ज फेडण्यासाठी दुचाकी चोरी; चोराला अटक
रस्त्यावरचे वाद नित्याचे
शहरात रस्त्यावर झालेल्या किरकोळ वादातून वाहनचालकांना मारहाण करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी बाणेर-पाषण रस्त्यावर किरकोळ कारणावरुन एका मोटारचालकाने दुचाकीस्वार तरुणीच्या नाकावर ठोसा मारला. या घटनेत तरुणी जखमी झाली होती. येरवडा भागात मोटारीतून निघालेल्या एका लष्करी अधिकाऱ्याला टोळक्याने शिवीगाळ केल्याची घटना नुकतीच घडली होती.