पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष विविध राज्यात चाचपणी करत आहेत. भाजप विरोधात देशपातळीवर इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आघाडीतील जागा वाटपावरुन विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याविरोधात नाराजी असून आम आदमी पक्षाला ही संधी आहे. त्यामुळे पक्षाने मावळ लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांकडून पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना साकडे घालण्यात आले आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील इंडिया आघाडीला बंगालमध्ये फार जागा देण्यास तयार नाहीत, तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वबळाचा नारा दिल्याने खळबळ उडाली आहे. आम आदमी पक्ष देखील महाराष्ट्रातील लोकसभेच्या काही जागा लढविण्यासाठी इच्छुक आहे. गेल्या आठवड्यात अरविंद केजरीवाल यांनी गोवा दौरा करुन राज्यातील लोकसभा जागावाटपाबाबत इंडिया आघाडीसोबत चर्चा सुरु असल्याचे सांगितले. या दौऱ्यात मावळच्या विद्यमान खासदारांबद्दल असणारी नाराजी निवडणूक जिंकण्यासाठी पुरेशी असल्याचे केजरीवाल यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा : मोठी बातमी : मराठा सर्वेक्षणावर आता मागासवर्ग आयोगाचा वॉच
महाराष्ट्रात मावळ लोकसभा मतदारसंघात आपचा उमेदवार उभा करण्याची विनंती या वेळी करण्यात आली. लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याचे आश्वासन केजरीवाल यांनी या वेळी दिले, असे आपचे पिंपरी-चिंचवड युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी सांगितले. जागावाटपाबाबत केजरीवाल हेच निर्णय घेतील आणि आप इंडिया आघाडीचा भाग असल्याने अंतिम चर्चा झाल्यानंतर जागा वाटपाबाबत जाहीर केले जाईल, असेही काळे यांनी सांगितले.