पुणे : ‘भावना दुखावल्या जाण्यातून होणारे वर्तन आपल्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाजात पदोपदी दिसत असेल तर कलेच्या माध्यमातून आम्ही वर्तमानाशी संबंध जोडायचा की नाही? समकालीन वास्तवाशी निगडित कला निर्माण करायची की नाही? अमुक एका पद्धतीने कलानिर्मिती करा, असे फतवे वारंवार निघत असतील, तर कलाकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आणि आविष्कार स्वातंत्र्याचे काय? कलाकाराला भिडणारे वास्तव समाजाला आवडणारे नसेल, तर त्या कलावंताने करायचे काय? कलावंतांची मुस्कटदाबी वाढत जाणे कितपत योग्य,’ असे परखड सवाल ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, चित्रकार अमोल पालेकर यांनी रविवारी उपस्थित केले.

बंडखोर चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सुझा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कला गजर, महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि सलोखा यांच्या वतीने ज्योत्स्ना भोळे सभागृह येथील पुणे गॅलरी ऑफ व्हिज्युअल आर्ट्स येथे भरविण्यात आलेल्या सुझा यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन अमोल पालेकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी पालेकर बोलत होते. सुझा यांच्या चित्रांविषयी प्राध्यापिका आणि चित्रकार शुक्ला विनायक सावंत यांचे व्याख्यान झाले. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले आणि कला गजर संस्थेचे संदेश भंडारे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा: पुण्यात सभेनंतर मनोज जरांगे पाटील उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल

‘व्यवस्थेविरुद्ध बंडखोरी करून जाहीरपणे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य कलाकाराला आहे. या स्वातंत्र्याचा संकोच झाल्यावरही आम्ही गप्प बसणार असू, शासनाच्या अनुदान आणि पुरस्कारापोटी बोटचेपी भूमिका घेणार असू, तर आजूबाजूला अंध:कारच आहे, असे म्हणावे लागेल. कलावंत अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी झगडा देत असतात. पण, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगायला आम्ही रसिक मंडळी का नसतो,’ असा प्रश्न उपस्थित करून पालेकर म्हणाले, ‘जी संहिता छापली जाऊ शकते ती रंगमंचावर सादर करायला काय हरकत आहे? नाटक बघण्याचा रसिक म्हणून असलेला अधिकार आम्ही का वापरत नाही? एखाद्या नाटकाचा मूठभर लोकांसमोर प्रयोग झाल्यावर त्यातून भावना दुखावल्या गेल्या म्हणून ते बंद पाडले जाते. बंद पाडणारे तक्रार करतात आणि त्यावरून पोलीस नाटक सादर करणाऱ्या कलाकारांवर कारवाई करतात. अशी टोकाची विरोधी भूमिका घेतल्यानंतरही आम्ही पुन्हा गप्प बसतो, ही गोष्ट मला अस्वस्थ करते. गप्प बसून खतपाणी घालण्याचे काम तरी सुसंस्कृत नाट्यरसिक म्हणून बंद करू या.’

हेही वाचा: पोलीस कोठडीतील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, तपास सीआयडीकडे

‘सुझा यांचा स्वातंत्र्यसैनिक म्हणून गौरव करायला हवा होता’

‘जे. जे. कला महाविद्यालयात शिकत असताना फ्रान्सिस न्यूटन सुझा यांच्याबद्दल कुजबुजल्या स्वरांत किंवा व्रात्य मुलाबद्दल अपराध वाटावा, अशा सुरांमध्ये बोलले जायचे. एका जाहीर सभेत युनियन जॅक खेचला या कारणांवरून त्यांची जे. जे. कला महाविद्यालयातून हकालपट्टी झाली होती. त्या वेळी ब्रिटिशांचे राज्य होते. त्यामुळे ती कारवाई अपेक्षितच होती. पण, देश स्वतंत्र झाल्यानंतर सुझा यांचा स्वातंत्र्यसैनिक म्हणून गौरव करायला हवा होता. कदाचित ते परदेशात वास्तव्यास असल्याने या अपराधाचे परिमार्जन करायला संधी मिळाली नसावी,’ असे अमोल पालेकर म्हणाले.