पुणे : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज लोणावळ्यात जिमचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी तरुण आणि तरुणींना जिमचे महत्व पटवून दिले. तेव्हाच, त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस आणि जिमचा काही संबंध नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठी चार्ज मधील जनरल डायर कोण? असा सवालही त्यांनी केला.
आदित्य ठाकरे म्हणाले, जिमला घेऊन राजकीय रंग नको द्यायला. आज जिमची तरुणांना गरज आहे. तरुण फिटनेसला घेऊन जागरूक आहेत. सायकलिंग, मॅरेथॉन, रनिंग तसेच जिमला तरुण प्राधान्य देत आहेत. ही काळाची गरज आहे. पुढे ते म्हणाले, जिम आणि देवेंद्र फडणवीस यांचा काही संबंध नाही. असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे लवकरच शिवनेरीवर येणार आहेत. २०१८ साली जेव्हा राम मंदिराचा मुद्दा आम्ही उचलला आणि भाजपला याचा विसर पडला होता. आम्ही कायदा आणा, या मागणीवर ठाम होतो. योगायोग असा की शिवनेरी किल्ल्यावरून मूठभर माती आपण अयोध्येला नेली आणि त्यानंतर पुढच्या नोव्हेंबरमध्ये मंदिराचा निकाल लागला होता. ही भावना आमच्या मनात आहे. त्यामुळे अयोध्येला जाण्यापूर्वी पुन्हा एकदा शिवनेरी गडावर उद्धव ठाकरे नक्की जातील आणि तिथली मूठभर माती घेऊन अयोध्येला लवकरचं जाऊ, असे आदित्य ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी कारसेवा करतानाचा फोटो एक्स केला. तो मी अद्याप पाहिला नाही. त्यामुळे त्यावर बोलणं योग्य नाही.
हेही वाचा : मराठा मोर्चासाठी कडक बंदोबस्त; एक हजार पोलिसांसह दंगलनियंत्रक पथक तैनात
आंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्जचा जनरल डायर कोण?
आदित्य ठाकरे म्हणाले, मी पुन्हा एकदा तेच सांगेन. जो लाठीचार्ज झाला, त्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यातील जनरल डायर कोण? हे अद्याप जनतेला समजलेलं नाही. अधिकाऱ्यांची तर बदली झाली. पण, आदेश देणारे कोण? मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री? हे जनतेसमोर यायला हवं. प्रत्येक क्षेत्रात हे सरकार काहीच करताना दिसत नाही.