पुणे : शहरातील मुळा आणि मुठा नदी पात्राच्या संवर्धनासाठी शहरातील विविध पर्यावरणप्रेमी, सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींनी आज एक चर्चासत्र आयोजित केले होते. त्या चर्चासत्राला ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावत अनेक मुद्दे देखील उपस्थित केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा : भिवंडीत अल्पवयीन मुलाचे अपहरण करून खून; पुण्यातील सराईत अटकेत
आदित्य ठाकरे म्हणाले की, पुणे शहराच्या मध्य भागातून मुळा आणि मुठा नदी वाहत आहे. पण मागील काही वर्षांत या नदीचे पात्र दोन्ही बाजूने भर घालून लहान करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात शहराच्या दृष्टीने धोकादायक आहे. या नदीचे पात्र पूर्वी सारखेच राहिले पाहिजे आणि त्याचे खोलीकरण देखील झाले पाहिजे. यासाठी शहरातील पर्यावरण प्रेमी, सर्व सामान्य नागरिक आणि सर्व पक्षांनी एकत्रित आले पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाला नेमके नदीपात्रात कशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे. त्याबाबत सादरीकरण केले पाहिजे आणि ही कामं रोखली पाहिजे. आपण गुजरातमधील ठेकेदार, सल्लागाराचा विकास करतोय की, पुणेकर नागरिकांचा विकास करतोय, याबाबतचा आपण विचार करण्याची गरज असून जर ही कामं रोखली नाहीत, तर नदीपात्र संवर्धनासाठी रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारले पाहिजे अशी भूमिका यावेळी आदित्य ठाकरे यांनी मांडली.