पिंपरी : महापालिकेत टीडीआर, कचरा, करोनातही घोटाळा झाला आहे. घोटाळेबाज सरकारमध्ये केवळ घोटाळेच सुरू आहेत. २०२४ मध्ये आमचे सरकार आल्यानंतर ज्या लोकांनी, मंत्र्यांनी, अगदी मुख्यमंत्री, अधिकाऱ्यांनी जनतेचे पैसे खाल्ले असतील. त्यांना कारागृहात बसवून पैसे मोजायला लावून सरकारच्या तिजोरीत भरायला लावले जातील, असा हल्ला ठाकरे गटाच्या युवासेनेचे प्रमुख, आमदार नीआदित्य ठाकरे यां केली. तसेच मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे लपतछपत गद्दार गटात गेले. त्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला असल्याचा हल्ला आदित्य ठाकरे यांनी चढविला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार नाही तर भाजपच्या संविधानानुसार शिवसेनेबाबतचा निर्णय दिल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरे हे रविवारी मावळ दौऱ्यावर असून पिंपरीत त्यांची ‘महा न्याय, महानिष्ठा’ सभा झाली. ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, राज्य संघटक एकनाथ पवार, मावळचे संघटक संजोग वाघेरे, शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, संघटिका सुलभा उबाळे यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा : “औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं पण…”, आदित्य ठाकरे हिंदुत्वाचा अर्थ सांगत म्हणाले…
आदित्य ठाकरे म्हणाले, राजकीय वातावरण तापू लागले आहे. जिद्दीने, ताकदीने एकत्र आलो आहोत. आपल्याकडे खोके नाहीत. मस्ती, माज नाही. अवकाळी सरकार डोक्यावर बसवले आहे. भाजपप्रणित हे खोके सरकार आहे. खोके सरकार हटाव, महाराष्ट्र बचाव असा नारा राज्यातील जनता देत आहे. दोन पक्ष, एक कुटुंब फोडले. खुर्च्या मिळविल्या पण राज्यातील जनतेला काही मिळाले नाही. सर्व उद्योग, गद्दार आमदार गुजरातला पळविले. राज्यातील महिला सुरक्षित नाहीत, तरुणांच्या हाताला रोजगार नाही. शेतकरी अडचणीत आहेत.
वेदांत फॉक्सन कंपनी एक लाख लोकांना नोकरी देणार होती. परंतु, हा प्रकल्प गुजरातला नेला. महाराष्ट्रात दोन वर्षात हा उद्योग सुरु झाला असता. गुजरातमध्ये हा उद्योग सुरू करण्यासाठी आठ वर्षे लागतील असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विश्वचषकाचा अंतिम सामनाही मुंबईऐवजी गुजरातमध्ये घेण्यात आला. त्यामुळेच भारताचा पराभव झाला. अन्याय सहन करायचा नाही, भूलथापांना बळी पडायचे नाही. आपण भांडलो तर खोके सरकार पुन्हा डोक्यावर बसेल आणि गुजरातमधून चालेल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा : “अगदी कोणाच्या स्वीय सहाय्यकांवरही विश्वास ठेवू नका, नाही तर…”; अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत
सचिन अहिर म्हणाले की, केंद्रीय मंत्री शंकराचार्यांचे काय योगदान आहे असे म्हणत आहेत. त्यांना जनता कधी माफ करणार नाही. किती आले किती गेले त्यामुळे आम्हाला फरक पडणार नाही. ज्यांना दिले ते गेले, ज्यांना काही दिले नाही ते निष्ठेने राहिले.
निवडणुकीत मित्र पक्षाची मोठी मदत मिळाल्याचे काहीजण सांगतात. त्यांनी आता मित्र पक्षाचे चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जावे असे आव्हान खासदार श्रीरंग बारणे यांना दिले. विद्यमान खासदार निधी मिळत नाही, पक्ष गाडून टाकत आहेत असे म्हणत होते, आता त्यांच्याच मांडीला, मांडी लावून बसला आहात. निधीसाठी त्यांच्याकडे हात पसरत आहात. निधीसाठी तिकडे गेलात आम्ही निष्ठेसोबतच राहिलो आहोत. एक दिलाने काम करून मावळचा पुढील खासदार आपलाच झाला पाहिजे. मावळवर भगवा फडकविणार असल्याचा निर्धार संजोग वाघेरे यांनी केला.