पुणे : पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्गाटनाला मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने ते प्रवाशांसाठी खुले झाले नाही, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली. केंद्र सरकारला पुण्यासाठी वेळ नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला होत असलेल्या विलंबाचा मुद्दा आदित्य ठाकरे यांनी समाज माध्यमावर उपस्थित केला. ते म्हणाले की, पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होऊन पाच महिन्यांरपेक्षा अधिक काळ उलटला आहे. एखाद्या मंत्र्याच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी त्याला विलंब होत आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी ते खुले करण्यात आलेले नाही. रंगकाम आणि सीसीटीव्ही बसविणे यासारखी किरकोळ कामे अपूर्ण ठेवण्याची ही सरकारी यंत्रणांची खेळी आहे. यामुळे सरकारच्या सोयीनुसार उद्घाटनाचा निर्णय घेता येतो.
नवीन टर्मिनल कधी सुरू होणार, असा प्रश्न खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी विचारला होता. त्यावर सरकारी यंत्रणांनी सीसीटीव्ही कार्यान्वित न झाल्याचे कारण दिले होते. हे उत्तर काही आठवड्यांपूर्वी मिळाले होते. आता टर्मिनल सुरू न करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे कोणते कारण आहे. आधीच्या सरकारने नियोजन केलेल्या आणि केंद्र सरकारने रद्द केलेल्या नवीन विमानतळाबद्दल पुणेकर प्रश्न विचारत नाहीत, तर ते सध्याच्या विमानतळावरील नवीन टर्मिनल कधी सुरू करणार याची विचारणा करीत आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा : उन्हाच्या झळा वाढल्या; राज्यातून थंडीची पूर्ण माघार… जाणून घ्या, कारणे काय?
पुणे विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. हे टर्मिनल पूर्णपणे वातानुकूलित आहे. त्यात प्रवाशांसाठी पाच पादचारी पूल असून, याचबरोबर ३४ चेक-इन काउंटर असतील. तसेच, बॅगांसाठी इन-लाइन बॅगेज हँडलिंग सिस्टिम असेल. या टर्मिनलमध्ये २७ हजार चौरस फुटांमध्ये पादचारी उड्डाणपूल आणि विक्री केंद्रांसोबत प्रवाशांसाठी सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. नवीन टर्मिनलसाठी एकूण ४७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी टर्मिनलची पाहणी केली होती. नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर जुन्या इमारतीचे नूतनीकरण केले जाणार आहे.