पुणे : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडीत बेकायदा अफूची लागवड करण्यात आल्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणला. पोलिसांच्या पथकाने छापा टाकून १४ किलो अफूची बोंडे जप्त केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. तानाजी शांताराम हगवणे (वय ४८), शिवाजी बबन हगवणे (वय ५५, दोघे रा. किरकटवाडी, सिंहगड रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. किरकटवाडीतील नांदोशी रस्त्यावर इंद्रप्रस्थ सोसायटीजवळ आरोपी हगवणे यांची शेती आहे. शेतात बेकायदा अफूची लागवड करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि हवेली पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. हगवणे यांनी शेतात अफूची लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने १४ किलो अफूची बोंडे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या अफूच्या बोडांची किंमत २८ हजार ७०० रुपये आहे.
हेही वाचा : विनेशच्या ऑलिम्पिक सहभागावर टांगती तलवार; एकाच दिवशी दोन वजनी गटांत चाचणी दिल्याची तक्रार
दोघांविरुद्ध अमली पदार्थ विराेधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक निरीक्षक राहुल वांगडे, विकास अडागळे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, दत्ता तांबे, दगडू वीरकर, दिलीप आंबेकर, अशोक तारु यांनी ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे, अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. ग्रामीण भागात अफू लागवड करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आदेश दिले होते. सासवड परिसरातील कोडित गावात कांद्याच्या शेतीत अफूची लागवड करण्यात आल्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला होता. या कारवाईत पोलिसांनी दहा किलो ५०० ग्रॅम वजनाची अफूची बोंडे जप्त केली होती.