पुणे : राज्यांत खासगी विद्यापीठांची संख्या वाढत आहे. त्याद्वारे मोठ्या संख्येने पदवी प्रमाणपत्रांचे वाटप केले जात आहे. या प्रकारावर अंकुश लावण्याची गरज आहे. विद्यापीठांनी संख्येपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे, असे मत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे ( एआयसीटीई) उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी रविवारी मांडले. पुढील २५ वर्षांनी शिक्षण व्यवस्था कशी काम करेल, तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर, कुशल मनुष्यबळ अशा सर्व बाजूंनी विचार करणाऱ्या शिक्षणसंस्थाच टिकतील, असेही त्यांनी नमूद केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ८४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. जेरे बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी, खजिनदार अंजली खमितकर, कार्यकारिणी सदस्य श्रद्धा सिदिड, हर्ष दुधे, पूनम काटे, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे कार्यवाह गजेंद्र बडे या वेळी उपस्थित होते. वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केलेले पत्रकार; तसेच संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
हेही वाचा : २०२४ हे वर्ष जगासाठी महत्त्वाचे का ठरणार? जाणून घ्या सविस्तर…
डॉ. जेरे म्हणाले की, देशात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे. त्यासाठी शिक्षण प्रणालीत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात येत आहे. या धोरणाच्या पूर्ण अंमलबजावणीसाठी २०३० पर्यंतचा कालावधी लागणार आहे. धोरणामुळे शैक्षणिक पद्धतीमुळे पायाभूत बदलांसह तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. त्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी शिक्षण संस्थांना बदलावे लागेल.
देशात बराच काळ उच्च शिक्षण आयोगाऱ्या स्थापनेची चर्चा सुरू आहे. या आयोगाच्या अंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी), अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद ( एआयसीटीई), नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन ( एनसीटीई) अशा प्रामुख्याने तीन संस्था असतील. या आयोगाच्या स्थापनेचे विधेयक लवकरच संसदेत मंजुरीसाठी येण्याची शक्यता असल्याचे डॉ. जेरे यांनी सांगितले.
हेही वाचा : विनायक मेटे यांची विमाननगरमधील सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न; मेटेंच्या मुलाची आत्याविरुद्ध तक्रार
निमशहरांतील विद्यार्थी महत्त्वाचे…
आयआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांइतक्याच निमशहरांमधील विद्यार्थ्यांच्या कल्पना नावीन्यपूर्ण आहेत. त्यांच्यातूनही यशस्वी नवउद्यमी घडत आहेत. चांद्रयान मोहिमेत निमशहरांतील विद्यार्थ्यांची महत्त्वाची भूमिका आहे. नेचर या प्रतिष्ठित संशोधनपत्रिकेत भारतातील विज्ञान क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेऊन त्यात लहान शहरे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची दखल घेतल्याचे डॉ. जेरे यांन सांगितले.
नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार
आरोग्यशास्त्रातील प्रगती आणि संशोधनामुळे आताच्या पिढीचे आयुर्मान वाढले आहे. त्यामुळे ही पिढी अधिक काळ काम करू शकणार आहे. त्याचवेळी नोकऱ्यांचे स्वरूपही बदलणार असल्याने या पिढीला दोन-तीन क्षेत्रात नोकऱ्या कराव्या लागतील. त्यासाठीच्या आवश्यक कौशल्याचे शिक्षण घ्यावे लागेल. केवळ एकदा शिक्षण घेतले की झाले, ही संकल्पना संपुष्टात येईल. ‘मल्टिटास्किंग’ (एकाच वेळी वेगवेगळी काम करणे) पद्धतीने काम करणे आवश्यक होणार आहे, असे डॉ. जेरे यांनी सांगितले.