पुणे : शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली असून ती सोडविण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल, वर्तुळाकार रस्ता तसेच अन्य पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढविण्यात यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरूर’ रस्त्याच्या कामाची व्यवहार्यता तपासावी, असे आदेशही पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची (प्रोजेक्ट माॅनिटरिंग युनिट) बैठक गुरुवारी मंत्रालयात झाली. नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डाॅ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसेक यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते. तर, दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले, महामेट्रोचे व्यवस्थापकीयसंचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त शेखर सिंग, पीएमआरडीएचे महागनर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे उपस्थित होते.
‘प्रकल्पाला विलंब लागत असल्यामुळे त्यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत असून, राज्याचे आर्थिक नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी विकास प्रकल्प नियोजित वेळेतच पूर्ण करावेत. शहरातील वाहूतक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वर्तुळाकार मार्गाचे काम वेळेत पूर्ण करावे लागेल,’ असेही पवार यांनी सांगितले. लोणावळा येथील नियोजित स्काय वाॅक, टायगर पाॅइंट, पुणे-नाशिक ग्रीन फिल्ड सेमी हायस्पीड रेल्वे, शहरातील वस्ताद लहुजी साळवे स्मारकाच्या कामांचाही पवार यांनी आढावा घेऊन सूचना केली.