पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुणे दौर्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून शिवाजीनगर येथील मोदी बागेतील कार्यालयामध्ये बीडचे खासदार बजरंग सोनवणे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, शेकाप नेते आमदार जयंत पाटील, शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांसह राज्यभरातील अनेक नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपआपल्या मतदार संघातील सद्यस्थितीबाबत माहिती दिली. मात्र या सर्व नेत्यांच्या भेटीमध्ये अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा : पुणे : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून
या भेटीबाबत उमेश पाटील म्हणाले की, मी अजित पवार यांच्यावर नाराज नाही. मी शरद पवार यांना भेटण्यास आलो आहे. ही भाग्याची गोष्ट असून साहेबांना भेटता येतंय मी नशीबवान आहे. मी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वर्षांपासून असून तेव्हापासून तेथील हुकुमशाही, दडपशाहीला माझा विरोध राहिला आहे. मी पक्ष एकत्र असल्यापासून ती भूमिका मांडत आलो आहे. त्याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो आहे. तसेच पक्ष प्रवेशाबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.