पुणे : वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करून पहाडी पोपटांची (अलेक्झान्ड्रीन पॅराकिट) तस्करी केल्याप्रकरणी सीमा शुल्क विभाग आणि वन विभागाने पुणे रेल्वे स्थानक परिसरात नुकत्याच केलेल्या कारवाईत दोघांना अटक केली. या आरोपींना २१ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
शेख सरफराज शेख खदीर आणि सचिन सुजित रोजोरिया अशी आरोपींची नावे असून, त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरात पोपटांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती गेल्या आठवड्यात सीमा शुल्क विभागाला सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार टाकलेल्या छाप्यामध्ये शेख सरफराज शेख खदीर यास पोपटांसह ताब्यात घेण्यात आले होते. याप्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान सचिन सुजित रोजोरिया हे नवीन नाव पुढे आले. वन विभागाने सांगवी फाट्यावर सापळा रचून सचिन रोजोरिया यास ताब्यात घेतले. चौकशीत सहभाग स्पष्ट झाल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दोन्ही आरोपींना सोमवारी लष्कर येथील प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयाने २१ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानुसार, आरोपींची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत वनपरिमंडळ अधिकारी वैभव बाबर, प्रमोद रासकर, तसेच वनरक्षक काळुराम कड, अनिल राठोड, मधुकर गोडगे, ऑकर गुंड, विनायक ताठे, रमेश शिंदे सहभागी झाले होते.